Teacher MLC Election: शिक्षक आमदार मतदारयादीत 11 ‘गुरुजी’ बोगस? शाळांनी हात झटकले; ‘हे आमच्या शाळेत नाहीत..!’

Solapur MLC Election Teacher Voter List: सध्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू असताना, या यादीतील काही नावे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur MLC Election Teacher Voter List
Solapur MLC Election Teacher Voter ListSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur News: शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीत शिक्षक नसलेल्या ११ जणांची नावे समाविष्ट असल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ते आपल्या शाळेत कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी बार्शीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक व पदवीधर मतदारांची यादी २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.सध्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू असताना, या यादीतील काही नावे संशयाच्या भोवऱ्यात सापडली. शिक्षक नसलेल्या व्यक्तींचा मतदारयादीत समावेश झाल्याबाबतची माहिती समाजमाध्यमांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या आदेशानुसार झोनल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी संबंधित अर्जांची तपासणी सुरू केली. मतदार नोंदणीसाठी अर्जदारांनी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एम. जी. गुरुकुल आणि बार्शी तालुक्यातील ज्योतीबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांवर शाळांच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्याचे आढळले.

Solapur MLC Election Teacher Voter List
Satej Patil: सतेज पाटलांनी ‘गोकुळ’चे मैदान कसं मारलं? बलाढ्य सत्तेला दिले हादरे; 7 मुद्दे ठरले गेमचेंजर

या प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांकडे लेखी माहिती मागवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संबंधित व्यक्ती आपल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसल्याचे कळवले. या पडताळणीतून संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Solapur MLC Election Teacher Voter List
Drought Relief: दुष्काळात काम हवंय? ‘रोहयो’च्या हेल्पलाइनवर फोन करा; 15 दिवसांत रोजगार मिळवा

संशयित ११ जणांची नावे

ज्योतीबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाशी संबंधित म्हणून मोहन बाळासाहेब भोसले, अक्षय श्रीहरी चव्हाण आणि तुषार मोहन भोसले यांची नावे अर्जांमध्ये नमूद होती. तर पेहे येथील एम. जी. गुरुकुल प्रशालेसंदर्भात स्वप्निल अंबरूषी कापसे, रोहित बाबासाहेब कापसे, पृथ्वीराज बाळासाहेब कापसे, शुक्राचार्य शाहुराजे बाबर, सुरज युवराज बाबर, सुदेश नवनाथ कापसे, अभिजीत बापू डिसले आणि संतोषी किशोर धेंडे या आठ जणांची नावे समोर आली आहेत. दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित व्यक्ती शिक्षक नसल्याचे प्रशासनाला कळवले आहे.

स्वाक्षरी आणि शिक्क्यांची होणार तपासणी

मतदार नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवरील स्वाक्षऱ्या आणि शिक्के खरे आहेत की बनावट, याची तपासणी आता फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि हस्ताक्षरतज्ज्ञांच्या मदतीने केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com