sambhaji nilgekar, babasaheb patil, dheeraj deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Latur District Bank Election : महायुतीच्या व्यासपीठावर निलंगेकर-पाटील यांच्यात दिलजमाई, तरी धीरज देशमुख म्हणतात, 'बाबासाहेब मनाने आमच्यासोबतच!'

political developments News : जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली, युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून बाबासाहेब पाटील, संभाजी पाटील निलंगेकर या दोघांनाही कानपिचक्या देण्यात आल्या.

Jagdish Pansare

Latur DCC Bank Election : लातूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूका पुढे ढकला, प्रशासक नेमा, अशी मागणी करत न्यायालयात घेतलेली धाव अपयशी ठरली. या निमित्ताने महायुतीतील जिल्ह्यातील दोन नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील राजकीय कलगितुराही रंगला. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत.

कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे निलंगेकर-पाटील एकमेकांच्या मांडीला मांडी लावून महायुतीच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. यातून आमच्यातील वाद, मतभेद मिटले हे दाखवण्याचा युतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे काँग्रसेचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांनी मात्र बाबासाहेब पाटील हे मनाने आमच्यासोबत असल्याचे विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

आता धीरज देशमुख यांचा हा दावा खरा आहे, की मग महायुतीमध्ये बुद्धीभेद करण्यासाठी केलेली खेळी? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक यंदा चांगलीच गाजताना दिसत आहे. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil) यांनी बँकेच्या कारभारावर आणि त्यांच्या कारभाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर प्रशासक नेमा आणि बँकेच्या कारभाराची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूका घ्या, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

दरम्यान, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची काँग्रेसशी वाढती जवळीक निलंगेकर यांना खूपत होती. यातूनच त्यांनी पाटील यांना ते महायुतीचे मंत्री असल्याचा विसर पडला आहे का? ते काँग्रेससोबत (Congress) निवडणूक लढवणार आहेत, असा आरोप करत आम्ही त्यांच्याविरोधात आक्रमकपणे लढू, असा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली, युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून बाबासाहेब पाटील, संभाजी पाटील निलंगेकर या दोघांनाही कानपिचक्या देण्यात आल्या.

आता हे दोन्ही नेते काही घडलंच नाही, अशा पद्धतीने सोबत वावरताना दिसत आहे. सहाजिकच याचा काँग्रेसला याचा त्रास होणार. मात्र गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा बँकेची सत्ता एकहाती आपल्याकडे राखणाऱ्या देशमुख कुटुंबाने आता आपल्या खेळाला सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार धीरज देशमुख यांनी 'बाबासाहेब पाटील हे तन आणि मनाने आमच्यासोबतच आहेत' असा दावा केला. सहकारातील निवडणूकीला कोणीही पक्षीय रंग देऊ नये, असेही ते म्हणाले.

धीरज देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. बाबासाहेब पाटील सध्या कोणासोबत आहेत? या प्रश्नावर ते आमच्यासोबत नाही, असे त्यांनी सांगितले आहे का? असा प्रतिप्रश्न केला. आमच्या पक्षाच्या नेत्यांची ताकद तर सोबत आहेच. पण, त्यासोबतीला अन्य नेत्यांची 'अदृश्य' ताकद आणि आशीर्वादही आमच्या पाठीशी आहेत, असा दावा देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT