

Satara News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात लवकरच जिल्हा बँकेच्या निवडणुका होत आहेत. या बँकेच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणुकी आधीच शिंदेंनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का दिला. बुधवारी माण-खटाव विधानसभेची निवडणूक लढणाऱ्या बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधीच राजकीय भूकंप झाला असून शिंदेच्या खेळीने सातारा जिल्ह्यातील राजकारण ३६० डिग्रीमध्ये बदलले असून या नेत्याच्या प्रवेशामुळे खळबळ माजली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या समोरील अडचणी देखील येत्या काळात वाढणार आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राजकीय कुरघोडीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यातच शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री जयकुमार गोरे, उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मोठा धक्का दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यातील राजकारणात आता येत्या काळात मोठी उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडीनंतर जयकुमार गोरे आणि उद्धव ठाकरे यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. येत्या कळत होत असलेल्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातून दोन सख्खे भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
गोरे यांच्या प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेखर गोरे यांना लोकांना न्याय द्यायचा असल्याने त्यांनी आज शिवसेनेवर (Shivsena) विश्वास ठेवून पक्षात पक्षप्रवेश केला. त्यांनी माझ्या नेतृत्वावर आणि पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. शेखर गोरे यांच्यामुळे सातारा जिल्ह्यात माण खटाव परिसरात शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू होईल, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी भेटलो आणि बुधवारी लगेचच माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश होत असल्याचे गोरे यांनी सांगितले. मी ज्यावेळी ज्या पक्षात गेलो त्यावेळी पूर्ण जोमाने त्या पक्षासाठी काम केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊनही मी जिल्हा बँकेचा संचालक झालो होतो. आता मात्र मी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रीय झालो असून येत्या याकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला जेवढी शिवसेना वाढवायची आहे तेवढी मी सातारा जिल्ह्यात नक्की वाढवून देईन, असा शब्द यावेळी शेखर गोरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.