Marathwada Politics : सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये राजकारण, पक्ष नसतो, असं सांगणारे नेते कमी नाहीत. पण याच सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राजकारण करून स्वत:ची किंवा आपल्या वारस, नातेवाईकांची वर्णी लावण्यात कोणीच मागे नाही.
नुकत्याच झालेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 'सहकार' आणि भाजपा व इतरांच्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज 'परिवर्तन' पॅनलकडून निवडून आलेल्या संचालकांवर नजर टाकली तर सहकाराचा नवा लातूर पॅटर्न या निवडणुकीत पहायला मिळाला.
लातूर जिल्ह्यातील बहुतांश प्रत्येक आमदाराच्या घरात एक संचालक पद असल्याचे कालच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दशकापासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेस पर्यायाने देशमुख कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे.
संचालक मंडळ, अध्यक्ष बिनविरोध करण्याची परंपरा यंदाच्या निवडणूकीत मोडीत निघाली. काँग्रेसच्या बँकेतील कारभारावर, कर्ज वाटप आणि एकूणच देशमुखांवर एकाधिकारशाहीचा आरोप करत भाजपाच्या संभाजी पाटील, अरविंद पाटील निलंगेकर या जोडीने निवडणूक घेण्यास भाग पाडले.
उमेदवारी अर्ज उडवण्याचे, प्रतिस्पर्ध्यांना माघार घ्यायला लावून काही संचालक बिनविरोध निवडून आणण्यात सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या सहकार पॅनलला यश आले. परंतु १९ पैकी पंधरा संचालकांसाठी निवडणूक घ्यावीच लागली. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी, आरोप प्रत्यारोप-मतदारांच्या अपहरणाचे प्रकरण अशी दिव्य पार करून अखेर निवडणुकीत ९९९ मतदारांनी मतदान केले. काल निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात बँकेचा कारभार गेला.
नवनिर्वाचित संचालकांमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख, भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे रमेशअप्पा कराड यांचे चिरंजीव ऋषीकेश कराड, आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे पुतणे अविनाश उर्फ बाळासाहेब जाधव यांचा समावेश आहे. पैकी अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या सहकार पॅनलमधून बिनविरोध संचालक झाल्या आहेत.
अपवाद उमरग्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजय बनसोडे हेच ठरले आहेत. त्यांच्या घरातून लातूर जिल्हा बँकेवर कोणीही संचालक म्हणून निवडून आलेला नाही. प्रचारा दरम्यान, आपण घरातील व्यक्ती किंवा नातेवाईकाला उमेदवारी दिली नाही, तर माझ्यासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला दिली, अशी भूमिका मांडली होती. सहकारात राजकारण नसते, पक्ष नसतो म्हणणाऱ्या नेत्यांनी सोयीचे राजकारण करत आपले वारस मात्र जिल्हा बँकेत संचालक म्हणून बसवले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.