Latur Lok Sabha Election Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Election : लढत शृंगारे-काळगेंची अन् प्रतिष्ठा मात्र देशमुख-निलंगेकरांची पणाला!

Amit Deshmukh Vs Sambhaji Patil Nilangekar : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे साईड इफेक्ट या दोघांच्या जिल्ह्यातील नेतृत्वावर आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत.

राम काळगे

Sudhakar Shringare Vs Shivaji Kalgeलोकसभेच्या लातूर मतदारसंघात भाजपची हॅटट्रिक, की काळगेंच्या रूपाने काँग्रेसचे कमबॅक? याचा फैसला काही तासांवर येऊन ठेपला आहे. 7 मे रोजी या मतदारसंघासाठी उत्साहात मतदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले गेले. उद्या निकाल काळे-शृंगारे यांचा लागणार आहे, पण या निमित्ताने प्रतिष्ठा मात्र दोन माजी मंत्र्यांची पणाला लागणार आहे.

एक आहेत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख तर दुसरे त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर(Sambhaji Patil Nilangekar). लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे साईड इफेक्ट या दोघांच्या जिल्ह्यातील नेतृत्वावर आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. त्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हाती येते? याचा निकालही उद्याच्या मतमोजणीनंतर लागणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे यांना मैदानात उतरवत काँग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले होते. काळगे यांच्या प्रचारासाठी संपुर्ण देशमुख कुटुंबाने जीवाचे रान केले होते. काँग्रेसने ही निवडणूक मनापासून लढली हे अमित देशमुख(Amit Deshmukh), धीरज देशमुख या दोन भावांनी घेतलेल्या मेहनतीवर स्पष्ट झाले होते.

लातूरमधील काँग्रेसच्या विजयाचा परिणाम केवळ जिल्ह्याच्या नाही तर मराठवाडा आणि राज्याच्या राजकारणावर होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेस नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली. चव्हाण यांच्यानंतर राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमित देशमुख यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.

लातूर लोकसभेसह नांदेड मतदारसंघात अमित देशमुख यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे या दोन मतदारसंघातील काँग्रेसच्या कामगिरीवर देशमुख यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे का? हे ठरणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना आपले वजन कायम राखायचे आहे. जिल्ह्यातील भाजपची सुत्रे दुसऱ्या कोणाच्या हाती जाणे निलंगेकर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवडणारे नाही.

सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप पक्षश्रेष्ठींनी निलंगेकर यांच्यावर सोपवली होती. भाजपची हॅट्रीक संभाजी पाटील यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक शृंगारे-काळगे यांची असली तरी प्रतिष्ठा देशमुख-निलंगेकर यांची पणाला लागली आहे. अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या लातूर लोकसभेच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सचिव विनोद तावडे(Vinod Tawade), मंत्री धनंजय मुंडे, चित्रा वाघ, अशोक चव्हाण तर काँग्रेसकडून राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आदी नेत्यांच्या सभा झाल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधीही काही कारणांमुळे लातूरमध्ये मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी अमित देशमुख यांच्याकडून आढावा घेतला होता. महायुती-महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ उद्या मिळणार आहे. त्याची गोडी देशमुख-निलंगेकर यांच्यापैकी कोणाला चाखायला मिळते हे निकालानंतर स्पष्ट होईल.

(Edted by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT