Sudhakar Shringare Sarkarnama
मराठवाडा

Latur LokSabha Constituency : सुधाकर शृंगारेंची राजकारणात एन्ट्री, अन् थेट दिल्लीच गाठली

राम काळगे

Lok Sabha Election 2024 : लातूरचे खासदार सुधाकर तुकाराम शृंगारे हे तसे राजकारणात फारसे चर्चेत नसलेले नाव. मूळचे व्यावसायिक आणि लातूरपेक्षाही मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमधे मोठे प्रकल्प उभारत शृंगारे यांनी बांधकाम व्यवसायात आपले नाव केले. या व्यवसायाच्या माध्यमातूनच शृंगारे यांची राज्यातील बड्या राजकीय नेतेमंडळीशी ओळख वाढली आणि संपर्कही वाढला. राजकारण्यांसोबतच्या मैत्रीनेच त्यांना 2019 च्या लोकसभेसाठी लातूर या राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

राजकारणात चर्चा नसली तरी जिल्ह्यातील भाजपच्या मजबूत संघटनेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात शृंगारे यांनी विजय मिळवत दिल्ली गाठली. त्यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा तब्बल 2 लाख 89 हजार 111 मतांनी पराभव केला. श्रृंगारे यांना 6,61,495 म्हणजे 56.22 टक्के इतके मतदान मिळाले होते. चर्चेत नसलेल्या, ज्याला निवडणूक लढवण्याचा कुठलाही अनुभव नाही, अशा नवख्या उमेदवाराने लातूरसारख्या काँग्रेसची मजबूत पकड असलेल्या मतदारसंघात विजय मिळवल्याने अनेकांसाठी हा धक्का होता. ज्या लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रम केला, त्या लातूर मतदारसंघात एका साध्या जिल्हा परिषद लढलेल्या सदस्याने काँग्रेसचा पराभव केला, याचा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

मोदी लाट आणि जिल्ह्यात भाजपच्या मजबूत बांधणीच्या जोरावर सुधाकर श्रृंगारे लोकसभेत पोहोचले. पण गेल्या साडेचार वर्षांत खासदार म्हणून मतदारसंघात त्यांना फारशी छाप पाडता आली नाही. खासदार म्हटले की दांडगा जनसंपर्क, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मतदारांशी कायम संपर्क, संघटनेच्या कामात पुढाकार हे आलेच. पण शृंगारे यालाही अपवाद ठरले. खासदार असूनही त्यांचा मतदारसंघाशी फारसा संपर्क कधी आलाच नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी दिसते.

केवळ आर्थिक ताकदीच्या जोरावर लोकसभेसारखी निवडणूकही जिंकता येते हे शृंगारेगारे यांनी गेल्या निवडणुकीत दाखवून दिले. पण राजकारणात सातत्याने यश मिळवण्यासाठी केवळ आर्थिक सुब्बता असून चालत नाही. तर थेट जनतेशी संपर्कही असावा लागतो. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी श्रृंगारे हे दुसऱ्यांदा इच्छुक असले तरी पक्ष त्यांना संधी देण्यास फारसा इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत यश मिळवून थेट दिल्ली गाठलेल्या श्रृंगारे यांची 2024 ची वाट मात्र बिकटच दिसते.

नाव ( Name)

सुधाकर तुकाराम शृंगारे

जन्म तारीख (Birth Date)

5 मे 1962

शिक्षण ( Education)

बी.एस्सी. (प्रवेश)

कौटुंबिक पार्श्वभूमी ( Family Background)

सुधाकर शृंगारे हे मूळचे घरणी (ता.चाकूर, जि. लातूर) येथील रहिवाशी आहेत. तुकाराम शृंगारे यांच्या सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातुश्रींचे नाव सुभद्राबाई शृंगारे आहे. पत्नी संगीता, दोन मुले शंकर, शुभम आणि मुलगी सुप्रिया असा त्यांचा परिवार आहे. घरणी (ता. चाकूर, जि. लातूर) या मूळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुधाकर शृंगारे यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते उदगीरला गेले. बारावीला असताना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून मजुरी करायला सुरु केली. पुणे, बंगळुरुसारख्या शहरात अनेक वर्षे मजुरी करतानाच त्यांनी बीएस.सी.ला प्रवेश घेतला. पुढे गुत्तेदारीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातच त्यांचा जम बसला.

नोकरी/व्यवसाय (Service/Business)

बांधकाम व्यावसायिक

लोकसभा मतदारसंघ कोणता? (lok sabha constituency)

लातूर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

सुधाकर शृंगारे यांचा मुळात राजकारण हा पिंडच नव्हता. बी.एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर ते व्यवसायाकडे वळले. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याआधी ते लातूर जिल्ह्यातील वडवळ गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. अहमदपूर-चाकूरचे आमदार विनायक पाटील यांनी त्यांना 2017 मध्ये राजकारणात आणले. जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्यही होते. 2019 दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि शृंगारे यांच्या गळ्यात थेट भाजपकडून उमेदवारीची माळ गळ्यात पडली.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

खासदार शृंगारे यांचा राजकीय प्रवास जेमतेम पाच वर्षांचा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशात कोरोनाची लाट आली. तेव्हा शृंगारे यांनी लातूर मतदारसंघातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप, औषधी आणि रुग्णांसाठी सात रुग्णवाहिका उपलब्ध करून देत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला होता. या शिवाय गरजू, विधवा, परित्यक्तांना अर्थिक साह्य मिळवून दिले. या शिवाय केंद्र शासनाच्या योजनांचा लाभही मिळवून दिला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदत, गरजू, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थिक मदत, विविध सामाजिक, धार्मिक कामांसाठीही खासदार शृंगारे यांनी सढळ हाताने मदत केली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

सुधाकर शृंगारे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

खासदार सुधाकर शृंगारे यांनी 2019 ची लोकसभा पहिल्यांदा लढवली. कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आर्थिक सुबत्ता आणि राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध या जोरावर शृंगारे मैदानात उतरले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्यामुळे सुधाकर शृंगारे यांचा तब्बल दोन लाख 89 हजार मतांनी विजय झाला.

काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांनी भाजपच्या शृंगारे यांच्यासमोर सपशेल हार पत्करली. 2014 प्रमाणेच 2019 ला ही मोदी लाट असल्याचा फायदा सुधाकर शृंगारे यांना झाला. शृंगारे यांच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. शृंगारे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव नसताना त्यांच्या एवढ्या मोठ्या विजयाचे श्रेय भाजपचे संघटन आणि निलंगेकर यांनी राबवलेली यंत्रणा याला जाते.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

लातूर लोकसभा मतदारसंघात खासदार शृंगारे यांचा संपर्क अत्यंत कमी आहे. केवळ पक्षाचे मोठे कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल तेव्हाच ते हजर असतात. इतर वेळी ते आपल्या व्यवसायाकडेच अधिक लक्ष देतात. त्यांच्या मतदारसंघातील कमी संपर्क आणि दुर्मिळ भेटीमुळे लोकांना कधीकधी आपला खासदार कोण? याचाही विसर पडतो, अशी टीका त्यांच्याबाबतीत केली जाते.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सध्या अनेक राजकीय पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधींकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषतः मतदारसंघातील विकासकामे, दौरे, बैठका, निधी याची माहिती देऊन ते आपल्या मतदारांच्या संपर्कात राहतात. परंतु खासदार शृंगारे याबाबतीतही फारसे उत्सुक दिसत नाहीत. फेसबुक, ट्विटर, एक्स, इन्स्टाग्रामपासून शृंगारे हे अंतर राखूनच आहेत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

सुधाकर शृंगारे यांनी पाच वर्षात लोकसभेत फारसे प्रश्न मांडले नाहीत. त्यांची विशेष अशी भाषण शैलीही नाही. तरीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा ते सार्वजनिक कार्यक्रमांत करत असतात. एप्रिल 2022 मध्ये शृंगारे यांनी लातूर जिल्ह्यातील प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांवर आपण दलित असल्यामुळेच आपल्याला सार्वजनिक कार्यक्रमात डावलले जाते, असा गंभीर आरोप केला होता. शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकेतही माझे नाव टाकले जात नाही, असे म्हणत त्यांनी रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात खळबळ उडवून दिली होती. हा प्रकार आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असा इशाराही त्यांनी तेव्हा दिला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

कै. गोपीनाथ मुंडे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

सुधाकर शृंगारे यांचे बालपण हलाखीत गेले, गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना शिक्षणासाठीही संघर्ष करावा लागला. मोलमजुरी करून आज बांधकाम व्यवसायात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावल्यानंतर शृंगारे जुने दिवस विसरले नाहीत. विद्यार्थी, गरजूंना आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत ते करतात.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

खासदार शृंगारे यांचा मतदारसंघात जनसंपर्क नाही, स्थानिक नेत्यांसोबत केवळ कार्यक्रमस्थळी हजेरी लावण्याचे सोपस्कार ते पाडतात. स्वतंत्र कार्यक्रम अथवा जनसंपर्काच्या बाबतीत ते इतर राजकारण्यांच्या तुलनेत अगदीच मागे आहेत. महाराष्ट्रातील ते असे खासदार आहेत ज्यांच्याबाबत पाच वर्षांत फारशी चर्चा झाली नाही.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

मतदारसंघात संपर्क नाही, सांगण्यासारखी ठोस विकासकामे नाहीत, तरीही सुधाकर शृंगारे हे दुसऱ्यांदा लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. मतदारांची नाराजी आणि नसलेला संपर्क पाहता उमेदवार बदलावा, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. या पार्श्वभूमीवर शृंगारे यांना डावलले तरी ते बंडखोरी किंवा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता नाही.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT