Congress leaders celebrate massive win in Latur Municipal Corporation as Amit Deshmukh leads party to clear majority, defeating BJP and Sambhaji Patil Nilangekar. Sarkarnama
मराठवाडा

Latur MahaPalika : लातूरात पंजा-पंजा-पंजा! अमित देशमुखांची जादू चालली; कमळ-कमळ-कमळ म्हणत गमछा भिरकवणारे संभाजी पाटील निलंगेकर तोंडघशी!

Latur Municipal Corporation Results : लातूर महापालिकेत काँग्रेसने 43 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडी यशस्वी ठरली, तर भाजप व संभाजी निलंगेकरांना मोठा पराभव स्वीकारावा लागला.

Jagdish Pansare

Congress-VBA News : लातूर महापालिकेत पंजा-पंजा-पंजा असेच चित्र निकालानंतर दिसू लागले आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणारे आमदार अमित देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला आहे. काँग्रेस पक्षाने 43 जागा जिंकत स्पष्ट बहुमत पटकावले आहे. निलंगा नगरपालिका निवडणुक जिंकल्यानंतर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता लातूर महापालिकेत कमळ-कमळ-कमळ असे म्हणत गमचा भिरकावला होता. मात्र लातूरच्या मतदारांनी त्यांना तोंडघशी पाडले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर शहरात येऊन इथून विलासराव देशमुख यांच्या आठवणी आता पुसल्या जातील अशी शंभर टक्के खात्री वाटत असल्याचे विधान केले. त्याच दिवशी भाजपचा शंभर टक्के पराभव निश्चित झाला होता हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे. झिरो टू हिरो अन आता पुन्हा झिरोच्या दिशेने भाजपची वाटचाल होते की काय? अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजी, निलंगेकर यांना निवडणूक प्रभारी केल्यानंतर इतर नेत्यांनी झटकलेले अंग या सगळ्याचा परिणाम भाजपला 22 जागांवर रोखण्यात झाला आहे.

अमित देशमुख यांनी भाजपच्या रणनितीला भेदत काँग्रेस-वंचित आघाडीची सत्ता आणली. लातूरमध्ये आमचेही ट्रिपल इंजिन असे म्हणत, खासदार, आमदार आणि आता महापौर असा दावा अमित देशमुख यांनी केला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला आहे. भाजपमधील लाथाळ्या, फोडोफोडीचे राजकारण, लातूर शहरात वाढती गुन्हेगारी, त्यातून सुसंस्कृत, शिक्षणाच्या लातूर पॅटर्नला लागत असलेला डाग पाहता लातूरच्या मतदारांनी अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसला साथ दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, प्रचारादरम्यान काँग्रेसने उचललेला तोच भावनिक मुद्दा, भारतीय जनता पक्षातील उमेदवारी देण्यात झालेली गडबड, अंतर्गत गटबाजीचा बसलेला फटका या सगळ्यात लातूर महापालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावत एकहाती सत्ता मिळविली. वंचित बहुजन आघाडीची साथही काँग्रेससाठी महत्त्वाची ठरली. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी एकट्याच्या खांद्यावर ही निवडणूक घेतली होती. त्यात त्यांना यश आले. लातूर हे देशमुखांचेच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

लातूर महापालिकेची 18 प्रभागांतील 70 जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीत काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली होती. त्यामुळे मागासवर्गीयांची मते त्यांना आपल्याकडे वळविण्यात यश आले. 43 जागा जिंकत काँग्रेसने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविले, तर वंचित बहुजन आघाडीनेदेखील पाचपैकी चार जागा जिंकत आपला विजयाचा स्ट्राइक रेट दाखवून दिला. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढली होती. राज्यातील एकही नेता प्रचारासाठी येथे आला नाही.

उमेदवारांची निवड, प्रभावी प्रचार यंत्रणा, बंडखोरांचे बंड थंड करणे अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर अमित देशमुख यांनी प्रभावी काम केले. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तसेच अंतर्गत गटबाजीचा फटकाही या पक्षाला बसला आहे.

2017 च्या निवडणुकीत 36 जागा जिंकणाऱ्या भाजपला (BJP) यावेळी 22 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने हवा केली होती, पण ती हवाच ठरली आणि या पक्षाचे कसेबसे खाते उघडले गेले. शिंदेंची शिवसेना, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, एमआयएम अशा पक्षांना तर महापालिकेत खातेही उघडता आलेले नाही.

एकूण जागा -70

  • काँग्रेस ------- 43

  • भाजपा --- 22

  • वंचित बहुजन आघाडी --- 4

  • राष्ट्रवादी काँग्रेस ---- 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT