Latur News : देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शिवराज पाटील चाकूर यांचा पुतळा कुठे उभारायचा? यावरून महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. महापालिका आवारात हा पुतळा न करता बाहेर करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. हा वाद ताजा असतानाच आता भाजपचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेत तत्काळ उभारा, अशी मागणी केली आहे.
देशाचे माजी गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल दिवंगत काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे राज्याच्या व देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे पुतळे हे तरुणांना व आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे, दिशा दाखविणारे असणार आहेत.
या दोन्ही नेत्यांच्या सहवासात काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांच्या या आठवणी सतत प्रेरणा देणाऱ्या आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर महानगरपालिकेत उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याप्रमाणे शिवराज पाटील चाकूरकरजी यांचा पुतळा लातूर महानगरपालिकेत उभारला पाहिजे. एकेकाळी त्यांनी लातूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर कार्य केलेले आहे.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुतळा जिल्हा परिषद आवारात बसवण्याची घोषणाही अनेक महिन्यांपूर्वी झाली होती. परंतु अद्याप तो पुतळा उभा राहिलेला नाही. या जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांचे पुतळे त्वरित उभारले जावेत, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली असल्याचे भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या आवारात आहे. ही शिक्षण समिती त्यांनीच उभारलेली आहे. आता त्यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात यावा, याबाबत यापूर्वीच ठराव घेण्यात आला आहे. या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. आता याच ठिकाणी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुतळा व्हावा, अशी मागणी शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.