लातूर महापालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात काँग्रेस आणि भाजप यांच्यात नवी चुरस निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे, तर संभाजी पाटील निलंगेकर ‘कमळ’ फुलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नव्या आरक्षणामुळे अनेक प्रभागांत उलथापालथ होऊन महापालिका निवडणुकीचे चित्र अधिक रोचक बनले आहे.
Local Body Election : लातूर महापालिकेच्या 18 प्रभागातील 70 जागांसाठी मंगळवारी (ता. 11) आरक्षण काढण्यात आले. या आरक्षणानंतर भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेसच्या काही दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांना एक तर सर्वसाधारणमधून उभे रहावे लागेल अन्यथा प्रभाग बदलावा लागेल. काही माजी नगरसेवक मात्र सेफ झोनमध्ये राहिले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यापुढे आता सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे. तर माजी मंत्री संभाजीपाटील निलंगेकर यांच्यासह भाजपच्या इतर नेते त्यांना कसे रोखतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
लातूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागरचनेत बदल झालेला नव्हता. गेल्यावेळी सारखेच 18 प्रभाग व 70 नगरसेवक असणार आहेत. यातील पहिले सोळा प्रभागात प्रत्येकी चार तर शेवटच्या 17 व 18 प्रभागात प्रत्येकी तीन नगरसेवक असणार आहेत. यापैकी 35 नगरसेवक या महिला असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी बारा जागा असून, त्यापैकी सहा जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 18 जागा असून त्या पैकी 9 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारणसाठी 39 जागा असून, त्यापैकी 20 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
आगामी महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्य़ात आला आहे. त्यामुळे 3 लाख 82 हजार 940 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीची संख्या 67 हजार 474 इतकी आहे. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी 12 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातीची संख्या 5 हजार 550 इतकी असून त्यांच्यासाठी एक जागा राखीव झाली आहे.
माजी महापौर सेफ
प्रभाग दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा सुटल्याने माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले सेफ झाले आहेत. प्रभाग पाचमधून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे गेल्या वेळी सर्वसाधारण जागेवरुन विजयी झाले होते. गेल्या आठ वर्षापासून त्यांनी हा प्रभाग संभाळला आहे. त्यामुळे त्यांचा दावा कायम आहे. पण यावेळी या प्रभागातून काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव हे इच्छूक आहेत. त्यामुळे पक्षाला येथे विचार करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. या प्रभागात उमेदवार निवडताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासमोर पेच असणार आहे.
प्रभाग दहा नागरिकांच्या मागास प्रवर्गाासाठी
प्रभाग सातमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक युनूस मोमीन यांच्या अडचणी वाढणार आहेत. सर्वसाधारणसाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. प्रभाग नऊमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर सेफ झोनमध्ये आहेत. तर जिल्हा बँकेच्या संचालक माजी नगरसेवक सपना किसवे यांना मात्र दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग दहामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाासाठी जागा सुटली नसल्याने माजी महापौर ॲड. दीपक सुळ यांना सर्वसाधारणमधून उभे रहावे लागणार आहे. प्रभाग तेरामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अयुब मणियार यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. माजी नगरसेवक रविशंकर जाधव यांच्यासाठी प्रभाग चौदा कायम राहिला आहे.
भाजपला फटका
या आरक्षण सोडतीनंतर भारतीय जनता पक्षाच्या दिग्गजांना फटका बसला आहे. यात प्रभाग एकमध्ये गेल्या वेळेस माजी उपमहापौर तत्कालीन शहराध्यक्ष देविदास काळे व विरोधी पक्ष नेता ॲड. शैलेश गोजमगुंडे हे दोघे विजयी झाले होते. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गा महिलेसाठी जागा सुटली आहे. तर सर्वसाधारण एकच जागा आहे. त्यामुळे दोघापैकी एकालाच निवडणूक लढवता येणार आहे. दुसऱ्याला दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग सहामध्ये भाजपचे माजी महापौर सुरेश पवार सेफ राहिले आहेत. प्रभाग बारा हा भाजपसाठी विस्कळीत झाला आहे.
अनुसुचित जाती महिलेसाठी जागा सुटल्याने माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे भाचे माजी नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर अडचणीत आले आहेत. याच ठिकाणी ॲड. गणेश गोमचाळे व देवा साळुंके यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. गेल्या वेळेस भाजपचे चंद्रकांत बिराजदार हे प्रभाग सतरामधून विजयी झाले होते. पण काँग्रेससोबत जावून ते उपमहापौर झाले होते. पण यावेळेस प्रभाग सतरामध्ये सर्वसाधारण जागा सुटली नसल्याने त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. माजी नगरसेवक भाजपचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर हे मात्र प्रभाग अठरामध्ये सेफ झोनमध्ये राहिले आहेत.
1. लातूर महापालिकेचे आरक्षण केव्हा जाहीर झाले?
लातूर महापालिकेचे आरक्षण 2025 निवडणुकांसाठी नुकतेच अधिकृतरीत्या जाहीर झाले आहे.
2. या आरक्षणाचा कोणत्या नेत्यांवर परिणाम होणार आहे?
अमित देशमुख यांच्या काँग्रेससाठी सत्ता राखणे कठीण होईल, तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भाजपला नवीन संधी निर्माण होईल.
3. आरक्षणाचे प्रमुख बदल कोणते आहेत?
काही महत्त्वाचे प्रभाग महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षित झाले आहेत, ज्यामुळे उमेदवारांचे गणित बदलले आहे.
4. स्थानिक पातळीवर काय प्रतिक्रिया दिसत आहे?
आरक्षणानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि दोन्ही पक्षांचे गट सक्रिय झाले आहेत.
5. पुढील महापालिका निवडणुकीत कोणती लढत रंगणार आहे?
काँग्रेसचे अमित देशमुख आणि भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात सरळ सत्ता लढत पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.