Maharashtra Police sarkarnama
मराठवाडा

Latur News: सहकारी पोलिसांच्या पगारावरच मारला डल्ला! 500 कर्मचाऱ्यांना चुना लावणाऱ्या पीएसआयसह चार जणांवर गुन्हा

Latur News: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात हा घोटाळ्याचा प्रकार घडला असून गेल्या दहा वर्षापासून राजरोसपणे हा सुरु होता प्रकार

Jagdish Pansare

Latur News: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल पावणे चारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याच सहकाऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारण्याच्या या प्रकारामुळे लातूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक व चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 कोटी 38 लाख 92 हजारांचा हा घोळ असून राहुल वाघदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय शिरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

2015 ते 2025 या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना पगारात दिल्या जाणाऱ्या इन्सेंटिव्ह, विशेष भत्ता व इतर कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या नोंदणीमध्ये खाडाखोड करून ही रक्कम वरील आरोपींनी स्वत:च्या खात्यावर वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक चौकशीनुसार या सर्व आरोपींनी संगनमताने बोगस कागदपत्रे तयार करून 368 कर्मचार्‍यांच्या पगारातून अतिरिक्त रक्कम काढली आहे.

राहुल वाघदरे यांनी 90 लाख 57 हजार, ब्रिज किशोर ठाकूर यांनी 1 कोटी 23 लाख 36 हजार तर दत्तात्रय शिरसागर यांनी 48 लाख 98 हजार रुपये आपल्या खात्यात वळवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या गैरप्रकारची चौकशी पोलीस उपाधीक्षक लातूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून वेगाने तपास करण्याच्या सूचना लातूरची पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत.

SCROLL FOR NEXT