Latur Railway Coach Factory Sarkarnama
मराठवाडा

Latur Railway Coach Factory : आठ वर्षात एकही डबा तयार झाला नाही; रेल्वे कोच फॅक्टरीत साडेचौदा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा काँग्रेसकडून आरोप!

Latur Rail Coach Factory controversy News : मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात 'मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी संघर्ष समिती'च्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.

Jagdish Pansare

Congress-BJP Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून तापलेले राजकीय वातावरण थंड होण्याचे नावच घेत नाहीये. जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान जंयतीदिनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या हाती आयते कोलीत आले. यावरून गदारोळ सुरू होत नाही तोच, अमित देशमुख यांनी दहा वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणणे हा विलासराव देशमुख यांना बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग होता, असे म्हणत भाजपवर हल्ला चढवला. आता पुन्हा लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीत साडेचौदा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित कंपनीचे प्रतिकात्मक श्राद्ध घालत काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे.

लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिक भूमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात 'मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी संघर्ष समिती'च्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून केंद्र सरकार व संबंधित प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केंद्र सरकार आणि कंपनीच्या कार्यपद्धतीवर टीका करताना चेन्नई येथील भारत सरकारची रेल्वे कंपनी कमी खर्चात कोच तयार करण्यास तयार असतानाही १४ हजार कोटी रुपयांचे टेंडर परदेशी (रशियन) भागीदारी असलेल्या कंपनीला देण्यात आले.

या प्रकल्पासाठी आतापर्यंत १४ हजार ४०० कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात एकही पूर्ण डबा तयार झालेला नसून केवळ बाहेरून आणलेल्या अर्ध्या बोगीचे वारंवार उद्घाटन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आणि तत्कालीन पालकमंत्र्यांनी लाखो रोजगार निर्माण होतील, असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात लातूरच्या एमआयडीसीतून एक खिळाही खरेदी न करता सर्व साहित्य व मनुष्यबळ बाहेरून आणले जात आहे. आयटीआय आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या स्थानिक तरुणांना केवळ सुरक्षा रक्षक किंवा सफाई कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीने राबवून घेतले जात असून हक्काची नोकरी मागणाऱ्या विलास मुळे या तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात विलास मुळे आणि कपिल धावडे बेमुदत उपोषणाला बसणार असून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) यांच्या माध्यमातून हा प्रश्न लोकसभेतही अधिक तीव्रतेने मांडला जाईल, असे अभय साळुंके यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही या आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पक्ष एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या, मात्र सरकारने हा 'ड्रीम प्रोजेक्ट' दाखवून स्थानिक जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पात नेमका किती खर्च केला आणि किती स्थानिकांना रोजगार दिला? याची श्वेतपत्रिका काढून पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली.

सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले तरुण येथे स्लीपर उचलण्याचे काम करत असून ही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना न्याय दिला नाही, तर आगामी काळात जनता सरकारचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT