Shivsena Vs NCP : रायगडमध्ये शिवसेनेचे राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के : पक्षबांधणीसाठी अख्खं तटकरे कुटुंब मैदानात

Sunil Tatkare Political Strategy In Raigad : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय मतभेद अधिक तीव्र झाले असून आता ते पक्ष फोडण्यापर्यंत पोहचले आहेत.
Sunil Tatkare & Aditi Tatkare
Sunil Tatkare & Aditi TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा धडाका सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीनेही संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी आता पक्षबांधणीसाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेच्या पक्षप्रवेशांनी राष्ट्रवादीसमोर आव्हान

रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि श्रीवर्धन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला अलीकडेच मोठे राजकीय धक्के बसले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप (आप्पा) देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. डी. पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे रोहा परिसरातील राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

माणगावमध्येही राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांसह माजी नगराध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तर श्रीवर्धन मतदारसंघात माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी तब्बल १७ वर्षांनंतर राष्ट्रवादीची साथ सोडली. आपल्या समर्थकांसह लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Sunil Tatkare & Aditi Tatkare
Raigad Politics : रायगडात अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले; राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का

पक्षबांधणीसाठी तटकरे कुटुंब मैदानात

शिवसेनेच्या वाढत्या पक्षप्रवेशांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करणे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणे, यावर भर दिला जात आहे.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या बैठकीला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. पक्ष संघटनेची सद्यस्थिती, आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक विस्तार याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश सरदार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. शहरातील पक्षसंघटना पुन्हा उभी करण्याची आणि कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

रिक्त शहराध्यक्षपदावरून विरोधकांची टीका

रोहा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद गेल्या काही काळापासून रिक्त होते. १ सप्टेंबर रोजी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी शहराध्यक्ष अमित उकडे आणि युवक अध्यक्ष सागर भोबड यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शहराध्यक्षपद रिक्त राहिल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका केली होती. प्रदेशाध्यक्षांना रोहा शहरासाठी अध्यक्षच मिळत नसल्याची टिप्पणीही करण्यात आली होती. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती कधी होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर महेश सरदार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून राष्ट्रवादीने संघटनात्मक पातळीवर नवी सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत.

'माझ्यामुळेच तुमचा टीआरपी वाढतो'; तटकरेंचा विरोधकांना टोला

बैठकीदरम्यान सुनील तटकरे यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. विरोधकांना आपले चेहरे दाखवण्यासाठी माझे नाव घ्यावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. 'ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे वक्तव्य मी कधी केले नाही; मात्र माझ्यामुळे टीआरपी वाढतो,' अशा आशयाची टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

Sunil Tatkare & Aditi Tatkare
Raigad Politics : ‘एकेकाळचा सत्तेतील शेकाप आज संपला; कुरघोडी राष्ट्रवादीची मैत्री लांब ठेवा' : विकास गोगावलेंचा शिवसेनेला सूचक इशारा

एकीकडे शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू असताना राष्ट्रवादीनेही नव्या नियुक्त्या आणि बैठकांच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगडमधील महायुतीचा अंतर्गत संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.