

Rajasthan Local Body Elections : राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. विधानसभेची निवडणूक २०२८ मध्ये होणार असून त्याआधी झालेल्या या मिनी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. हा पराभव केवळ राज्यातील भाजप सरकारसाठी नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर संघटनेलाही हादरा देणारा मानला जात आहे.
काँग्रेसने राज्यातील ३७ पैकी २४ जिल्हा परिषदा जिंकल्या असून भाजपच्या पदरात केवळ पाच जिल्हा परिषदा पडल्या आहेत. पंचायत समित्यांमध्येही भाजपला मोठा दणका बसला आहे. काँग्रेस सुमारे २६९ समित्यांमध्ये सभापती पदावर दावा सांगण्याच्या स्थितीत असून भाजपचे कमळ ७३ ठिकाणीच फुलू शकले. हे आकडे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढविणारे ठरले आहेत. मागील काही निवडणुकांच्या निकालावर नजर टाकली तर या निवडणुकीने मागील तीन दशकांचा रेकॉर्ड मोडला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये मागील ३० वर्षांतील सर्वाधिक वाढ तर भाजपच्या मतांमध्ये सर्वाधिक घट नोंदविली गेली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीतही असेच चित्र असून २०१० नंतर काँग्रेसला मिळालेला सर्वात मोठा विजय आहे. तर भाजपच्या मतांची टक्केवारी १६ वर्षांत पहिल्यांदाच कमी झाली आहे. झेडपीमध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये ५.६३ टक्के तर पंचायत समितीत ५.३७ टक्के वाढ झाली आहे.
दुसरीकडे मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारी जिल्हा परिषदेत ४.६५ आणि पंचायत समिती ४.२८ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती सदस्य हे ग्रामीण भागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात भाजपचा जनाधार कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मात्र भाजपने आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे शहरी भागात अजूनही भाजप मजबूत असल्याचे दिसले. मात्र, झेडपी आणि पंचायतच्या निवडणुकांमध्ये त्या आनंदावर विरजण पडल्याचे मानले जात आहे.
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांकडून भाजप आणि काँग्रेसला सातत्याने आलटून पालटून सत्ता दिली आहे. आगामी निवडणुकीत ही परंपरा खंडित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, बिहार या राज्यांमध्ये भाजपने इतिहास घडविलेला असताना त्यात राजस्थानही मागे राहू नये, यासाठी स्थानिक नेते तसेच राष्ट्रीय पातळीवरही नेतेही प्रयत्नशील आहेत.
राज्यात २०२८ च्या निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करून परंपरा मोडित काढण्याचे नियोजन नेत्यांकडून केले जात असावे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवाने एकप्रकारे त्या मनुसब्यांवर पाणी फिरले आहे. मतदारांनी या निवडणुकीत आपला कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. हाच कौल विधानसभेतही कायम राहणार, अशी चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे. त्यामळे निश्चितच भाजप नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.