Latur News : राज्यात आरक्षणाचा मुद्द्यावरुन पुन्हा एकदा टोकाचा संघर्ष निर्माण झाला असन राजकारणही ढवळून निघालं आहे.मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूने आरक्षणासाठीच्या लढ्यात काही आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलत जीवनही संपवल्याचं समोर आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आलं आणि राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा मुद्दा हैदराबाद गॅझटियर लागू करण्याचा जीआर काढत मार्गी लावला. मात्र,यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आणखी पेटला. याचदरम्यान, लातूर जिल्ह्यातील निलंगा, चाकूर तालुक्यातील आत्महत्या प्रकरणांत, आणि अहमदपूर तालुक्यातील आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक खुलासे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लातूर जिल्ह्यात दोन आत्महत्या प्रकरणांसह एका आत्महत्येप्रकरणांत पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (Reservation) लढ्यात ज्यांनी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं,त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या फेक असल्याची खळबळजनक बाब पोलिसांच्या तपासात समोर आल्यानं संपूर्ण लातूरसह मराठवाडा हादरला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे प्रकरण,चाकूर तालुक्यातील अनिल राठोड प्रकरण या दोन आत्महत्या आणि अहमदपूर तालुक्यातील बळीराम श्रीपती मुळे यांनी विषप्राशन करत केलेला आत्महत्या प्रयत्न प्रकरणी लिहिलेल्या सुसाईट नोट या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून,त्या आत्महत्येनंतर लिहित 'प्लॅन'केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या तीनही घटनांचा माध्यमातून सामाजिक आणि राजकीय दबावतंत्र तसेच सरकारकडून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे यांचा मृत्यू विजेचा करंट लागून झाल्याचं समोर आलं. पण महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळली. ही चिठ्ठी मेळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी ठेवल्यानं खळबळ उडाली आहे.
दुसर्या घटनेत चाकूर तालुक्यातील अनिल बळीराम राठोड यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांनी मोठा प्लॅन करत बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी खिशात ठेवली. पण ती चिठ्ठीही पोलिसांनी केलेल्या तपासात फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसर्या प्रकरणात अहमदपूर तालुक्यात बळीराम श्रीपती मुळे यांनी विषप्राशन करत आत्महत्येचं पाऊल उचललं होतं. पण दैव बलवत्तर म्हणून उपचारानंतर ते वाचले.मात्र,पोलिसांच्या तपासात त्यांच्या चुलत भावानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी मुळे यांच्या खिशात ठेवल्याचं उघड झालं. या तीनही प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
लातूर पोलिसही या तीनही प्रकरणांमुळे चांगलेच चक्रावले.आता या प्रकरणांमध्ये फसवणूक आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करताना गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणांची माहिती लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.