Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात 2016 मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात लातूर शहराला मिरज येथून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र होते, हा आमदार अमित देशमुख यांचा आरोप दुर्दैवी आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रत्युत्तर माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले. दुष्काळात तहानलेल्या नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, अशा आपत्कालीन उपाययोजनांना राजकीय षडयंत्र म्हणणे म्हणजे जनतेच्या वेदनांचा अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे 2016 मध्ये लातूर जिल्ह्यात गंभीर जलसंकट निर्माण झाले होते. शहराचा प्रमुख जलस्रोत असलेले मांजरा धरण जानेवारी 2016 मध्ये आटले होते. फेब्रुवारीमध्ये जलसाठे संपल्याने महानगरपालिकेला नियमित नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. शहराची सामान्य परिस्थितीतील दैनंदिन पाण्याची गरज 60 एमएलडी असताना दुष्काळात उपलब्ध स्रोतांतून केवळ 20 एमएलडी पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. या परिस्थितीची नोंद 25 एप्रिल 2016 रोजी राज्यसभेत सादर झालेल्या केंद्र सरकारच्या उत्तरातही आहे, असे लोणीकर म्हणाले.
या जलसंकटावर मात करण्यासाठी मिरज येथून जलदूत एक्स्प्रेसद्वारे पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ एप्रिल २०१६ रोजी पहिली प्रायोगिक रेल्वे रवाना झाली, तर १२ एप्रिलला सुमारे पाच लाख लिटर पाण्यासह ती लातूरमध्ये दाखल झाली. सुरुवातीला दहा वॅगन असलेल्या रेल्वेनंतर ५० वॅगनची व्यवस्था करण्यात आली. २० एप्रिल रोजी २५ लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे लातूरमध्ये पोहोचली. केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून ही आपत्कालीन व्यवस्था राबविण्यात आली होती, असे लोणीकर (Babanrao Lonikar) म्हणाले.
१२ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०१६ या कालावधीत एकूण १११ रेल्वे फेऱ्यांमधून ५ हजार १९० वॅगनद्वारे तब्बल २५९ कोटी ५० लाख लिटर नव्हे, तर २५ कोटी ९५ लाख लिटर पाणी लातूरला पोहोचविण्यात आले. या रेल्वे वाहतुकीसाठी पाच कोटी २३ लाख रुपये खर्च झाला. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या जुलै २०१७ मधील अहवालात या आकडेवारीची नोंद असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, १ ऑगस्ट २०१६ रोजी चांगला पाऊस झाल्याने साई आणि नागझरी बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला. त्यानंतर महानगरपालिकेने नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. प्रशासनाच्या विनंतीनंतर ९ ऑगस्ट रोजी जलदूत एक्स्प्रेसची १११ वी आणि अखेरची फेरी पूर्ण झाली. म्हणजेच पाणीटंचाईच्या काळात रेल्वे सुरू करण्यात आली आणि जलसाठे उपलब्ध झाल्यानंतर ती बंद करण्यात आली, हीच प्रशासनाची जबाबदार भूमिका होती, असे त्यांनी नमूद केले.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याविषयी आमच्या मनात आदर कायम आहे. मात्र, त्यांच्या सन्मानाच्या नावाखाली त्या काळातील भीषण जलसंकटाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राजकारणाचा विषय बनवू नये. दुष्काळात जनतेचे प्राण आणि पाण्याची गरज महत्त्वाची असते. भविष्यातही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना पाणी मिळवून देण्यासाठी सरकारने कोणतीही कसर सोडू नये. कायमस्वरूपी जलव्यवस्थेच्या नियोजनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.