Latur ZP President  Sarkarnama
मराठवाडा

Latur ZP President : काँग्रेस सत्तेबाहेर, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा अध्यक्ष, लातूर झेडपीमध्ये सत्ता समीकरण जुळलं!

BJP-NCP Yuti Latur ZP Politics : लातूर जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत नाही. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यातच भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले असून भाजपचा अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.

Jagdish Pansare

Latur BJP-NCP News : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त अखेर जाहीर झाला आहे. येत्या 16 मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकत काँग्रेस झेडपीत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर 18 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 सदस्य निवडून आले आहेत. राज्यात भाजपा-राष्ट्रवादीची युती असल्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन पक्षांची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष भाजपाचा होणार आहे. जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. परंतु भाजपा आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची मिळून संख्या बहुमताच्या पुढे जाते. भाजपाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त निवडून आल्यामुळे सहाजिकच अध्यक्ष त्यांच्या पक्षाचा होणार आहे. अध्यक्षपदावरून पूनम मुक्ता व उषा पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. जिल्हा परिषदेच्या 59 गटापैकी 15 गटातून सर्वसाधारण महिला विजयी झाल्या आहेत. यापैकी दहा ठिकाणी काँग्रेस विजयी झाले आहे. तर चार ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवता आला. एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.

निलंगेकरांचा की पवारांचा अध्यक्ष?

लोदगा (ता. औसा) गटातून पूनम मुक्ता, वलांडी (ता. देवणी) गटातून उषा पाटील, सरवडी (ता. निलंगा) गटातून कविता गोरे व खरोळा (ता. रेणापूर) गटातून शिवकन्या गोडभरले या विजयी झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी खरी रस्सीखेच ही पूनम मुक्ता व उषा पाटील यांच्यात पाहायला मिळत आहे. उषा पाटील या माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थक आहेत. पूनम मुक्ता या औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे कार्यकर्ते संतोष मुक्ता यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अध्यक्ष निलंगेकरांचा होणार की पवारांचा? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 23 जागा जिंकत काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ भाजप 18 जागांवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत. महायुतीचे बहुमत आहे. सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पण त्यांच्याकडे अध्यक्षपदासाठी आवश्यक सर्वसाधारण महिला उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे त्यांना महायुती करून उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागणार आहे.

असा असेल निवडीचा कार्यक्रम

लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड 9 मार्च रोजी दुपारी दोनला होणार आहे. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर पंचायत समित्यांसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तर रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर पंचायत समित्यांसाठी संबंधित तहसीलदार पिठासीन अधिकारी असणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड ता. 16 मार्च रोजी दुपारी दोनला होणार आहे. याकरिता पिठासीन अधिकारी अपर जिल्हाधिकारी असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT