BJP leaders in Latur react after Rameshappa Karad’s son withdraws from Zilla Parishad elections, following Chief Minister Devendra Fadnavis’ directive against family-based candidatures. Sarkarnama
मराठवाडा

Latur ZP Election : देवाभाऊंचा आदेश शिरसावंद्य, रमेशअप्पा कराड यांच्या मुलाची झेडपी निवडणुकीतून माघार; शृंगारे, भिसे, हाकेंचे काय?

BJP Latur News : देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर रमेशअप्पा कराड यांच्या मुलाने झेडपी निवडणुकीतून माघार घेतल्याने लातूर भाजपमधील इतर नेत्यांच्या कुटुंबीय उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jagdish Pansare

BJP News : भाजपच्या आमदार, खासदार व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा दंडक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून दिला आहे. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये देवाभाऊंच्या या धोरणाचा फटका अनेक नेत्यांना बसताना दिसतो आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार रमेशआप्पा कराड यांचा मुलगा ऋषिकेश याला रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली होती. काल ऋषिकेश कराड याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

पानगाव गटामध्ये सतीश आंबेकर हे आता भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असे जाहीर करण्यात आले आहे. रमेश कराड यांच्या मुलाने जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील इतर भाजप नेत्यांची धाकधूक आता वाढली आहे. माजी खासदार सुधाकर शृंगारे, भाजपचे पदाधिकारी गणेश हाके, माजी आमदार आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते त्र्यंबक भिसे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, वसंत डिगोळे अशा अनेक नेत्यांनी आपापल्या घरातील नातेवाईकांना झेडपीच्या आखाड्यात उतरवले होते.

आमदार रमेशआप्पा कराड यांच्या मुलानेच माघार घेतल्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपचे इतर नेते आपल्या घरातील उमेदवारांबाबत काय भूमिका घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटातून माजी आमदार त्रंबक भिसे यांच्या भावजय सरिता भिसे, चाकुर तालुक्यातील रोहिणी गटातून भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे, खंडाळी गटातून गणेश हाके यांच्या भावजय रेखा हाके यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची पुतणी, वसंत डिगोळे यांच्या सुनबाई पूजा यांच्या उमेदवारीवरही कराड यांच्या माघारी नंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

27 जानेवारी जिल्हा परिषदेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या दोन दिवसात लातूर भाजपमधील अनेक नेत्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घ्यावे लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा दंडुका उगारला जाऊ शकतो.

महापालिकेत नियम का केला नाही?

भारतीय जनता पक्ष हा शिस्तीसाठी ओळखला जातो. परंतु नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी घराणेशाही चालवली होती. कोणी मुलगा, मुलगी, सून, भाऊ, पुतण्या, मेव्हणा अशा नातेवाईकांना उमेदवारी दिली होती. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपंचायतीत एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी दिल्याने भाजपची राज्यभरात नाचक्की झाली होती.

मतदारांनीही नेत्यांची ही घराणेशाही मोडीत काढत या पाचही उमेदवारांना घरी बसवत नेत्यांना धडा शिकवला होता. यानंतरही महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही झालीच. लातूर जिल्ह्याचा विचार केला तर कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेले भाजपचे नेते पाशा पटेल यांच्या मुलाने महापालिकेची निवडणूक लढवली होती.

याशिवाय माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या सुनेने तर भाजप लातूर शहराचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार होत्या. त्या निवडूनही आल्या होत्या. मग असे असताना भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील हे देवाभाऊंचे धोरण ग्रामीण भागात राबवण्यासाठी एवढे आग्रही का? आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे धोरण जर पक्षाचे असेल तर मग उमेदवारांना एबी फॉर्म का दिले? असा सवालही नाराज नेते आता करू लागले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात काय काय घडामोडी घडतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT