Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News. Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti News : महायुतीचे नेते सांगतात एकत्र लढणार, स्थानिक पातळीवर मात्र स्वबळाची तयारी!

Leaders in the state announce that the Mahayuti alliance will fight together in the elections, while preparations for self-strength at the local level are underway. : राज्यात महायुतीची बहुमताने सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या तर यातून चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे नेत्यांनी महायुतीचा राग आळवला आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर महायुतीतील तीनही घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वेगळी रणनिती आखल्याचे चित्र आहे. राज्यातील बडे नेते स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही महायुतीत लढणार असे सांगत आहेत, स्थानिक पातळीवर मात्र त्यांना स्वबळाची तयारी करा, असे आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajingar) महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका होऊ शकतात असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या महत्वाच्या नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती एकत्रित लढणार असे जाहीर केले आहे.

राज्यात महायुतीची (Mahayuti) बहुमताने सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या तर यातून चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे नेत्यांनी महायुतीचा राग आळवला आहे. परंतु स्थानिक पातळीवर मात्र आपल्या पक्षाची ताकद वाढवा, स्वबळावर लढण्याची तयारी करा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महिनाभरापुर्वीच स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे सांगितले होते.

यावरून जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांमध्ये जुंपली होती. अशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्येही पहायला मिळते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर स्वबळाच्या भाषेला अधिकच धार आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेनेही भाजपला जशासतसे प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीपासून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची भूमिका मांडली होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनीही आम्ही भाजपला तसा प्रस्ताव देणार असल्याचे अगदी दोन महिन्यापुर्वी सांगितले होते. परंतु यानंतरही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळाची भाषा सुरूच राहिली. यावर शिरसाट यांनी तुम्हाला स्वतंत्र लढायचे असेल तर आमचीही तयारी असल्याचे सांगत दंड थोपटले.

आता महायुती की स्वबळ? हे गुऱ्हाळ आणखी काही महिने सुरूच राहणार, एवढे मात्र निश्चित. महायुतीतील भांडणात महाविकास आघाडी, एमआयएम पक्षाचा फायदा होऊ नये यांची काळजी देखील नेत्यांना घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे एमआयएम महाविकास आघाडी आणि महायुतीतील घडामोडींवर नजर ठेवून आहे. आघाडी-युतीमध्ये फूट पडून ते स्वतंत्र लढावेत, अशीच एमआयएमची इच्छा आहे. असे झाले तर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या आणि त्या जोरावर महापालिकेत किंगमेकर होण्याचे एमआयएमचे मनसुबे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT