लोहारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्व चारही जागा पुन्हा महिला राखीव ठरल्याने पुरुष नेत्यांचा राजकीय मार्ग बंद झाला आहे.
सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षण झाल्याने अनेक अनुभवी नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
स्थानिक राजकारणात आता महिलांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता असून, नवीन महिला उमेदवार पुढे येतील.
नीलकंठ कांबळे
Local Body Election 2025 : लोहारा पंचायत समितीच्या आठ गणांसह जिल्हा परिषदेच्या चार गटांच्या आरक्षण सोडतीत सर्व चार गट महिलांसाठी आरक्षित झाल्याने तालुक्यात पुन्हा महिला राज अवतरले आहे. 2017 च्या निवडणुकीतही चारही गट महिलांसाठी आरक्षित होते. पुन्हा तोच निकाल लागल्याने, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे यंदा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरूष इच्छूकांचा पुन्हा हिरमोड झाला.
जिल्हा परिषद (Zilla Parisad) गटाच्या तालुक्यातील आरक्षणाकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आज आरक्षण जाहीर झाले. पण गेल्या निवडणुकीत जे चित्र होते तेच कायम राहिल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे तर पुरूष मंडळीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील सास्तूर, माकणी, जवळी कानेगाव हे जिल्हा परिषदेचे चार गट आहेत. या गटांमध्ये मागील काही वर्षांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, या आरक्षण सोडतीने त्यांच्याच राजकीय समीकरणांवर पाणी फिरवले आहे.
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राहुल पाटील यांचा प्रभाव असलेला सास्तूर गट यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी विजय मिळवला होता. मात्र, नव्या आरक्षणामुळे (Reservation) पाटील कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या राजकारणातून विस्थापित व्हावे, लागणार आहे. तसेच माकणी गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगेकर यांच्या सूनबाई अश्विनी जवळगेकर या निवडून आल्या होत्या.
आता नव्या महिला आरक्षणामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जेवळी गटाचे नेतृत्व करणाऱ्या शोभा तोरकडे यांचा गट शाबूत राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्या काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे यांच्या पत्नी आहेत. कानेगाव गट मागील वेळी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव होता, त्यावेळी चंद्रकला नारायणकर कर निवडून आल्या होत्या. यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठरल्याने या गटात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन कार्यकाळांपासून तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट महिलांसाठीच आरक्षित राहिल्याने, अनुभवी पुरुष पुढाऱ्यांना राजकारणात बाजूला व्हावे लागत आहे. मात्र, या पुढाऱ्यांनी पुन्हा आपल्या पत्नींना निवडणूक रिंगणात उतरवून सत्तेची चावी हातात ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे महिला उमेदवार दिसत असल्या तरी, त्यांच्या पाठीमागे पुरुषांची छाया कायम असणार आहे.
पंचायत समितीच्या आठ जागांसाठीची आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात आज जाहीर झाली. उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटविकास अधिकारी जयदेव वग्गे, नायब तहसीलदार रतन काजळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. आठपैकी पाच गण आरक्षित झाले आहेत. यात अनुसूचित जातीसाठी एक, इतर मागासवर्गीयासाठी दोन आणि सर्वसाधारण महिलांसाठी दोन गणांचा समावेश आहे.
या आरक्षणामुळे अनेकांचे मनसुबे उधळले गेले आहेत. प्रत्येकाला आपल्या पंचायत समिती गणामध्ये आपल्या बाजूने आरक्षण पडेल असे वाटत होते. मात्र, या आरक्षणाने अनेकांना धक्का दिला आहे. बहुतांश गणात आरक्षणात बदल झाला असल्याने नवीन इच्छुक उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे.
पंचायत समिती गणनिहाय आरक्षण
कानेगाव... सर्वसाधारण
भातागळी... इतर मागास प्रवर्ग
माकणी... इतर मागास प्रवर्ग महिला
धानुरी...सर्वसाधारण
सास्तूर...सर्वसाधारण महिला
तावशीगड...अनुसूचित जाती महिला
जेवळी...सर्वसाधारण
अचलेर...सर्वसाधारण महिला
जिल्हा परिषद गट
कानेगाव....सर्वसाधारण महिला
माकणी .... सर्वसाधारण महिला
सास्तूर .... अनुसूचित जाती महिला
जेवळी .... सर्वसाधारण महिला
1. लोहारा तालुक्यात किती जागा महिला राखीव झाल्या?
या वेळेस जिल्हा परिषदेच्या सर्व चारही जागा महिला राखीव ठरल्या आहेत.
2. पुरुष नेत्यांवर याचा काय परिणाम झाला?
पुरुष नेत्यांना निवडणुकीतून बाहेर रहावे लागणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
3. सलग कितव्यांदा लोहारा तालुक्यात महिला आरक्षण झाले?
ही सलग दुसरी वेळ आहे जेव्हा सर्व जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.
4. स्थानिक राजकारणात काय बदल होऊ शकतात?
महिला उमेदवारांची नवी पिढी पुढे येईल आणि राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
5. कोणत्या पक्षांना याचा फायदा होऊ शकतो?
ज्या पक्षांकडे सक्षम महिला नेतृत्व आहे, त्यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.