Prakash Ambedkar, Asaduddin Owaisi
Prakash Ambedkar, Asaduddin Owaisi Sarkarnama
मराठवाडा

AIMIM News : बडेभाई प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची ओवेसींची खेळी यशस्वी होणार का?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर 'एमआयएम'चा (MIM) महाराष्ट्रातील एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला, त्याच संभाजीनगरात काल एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली.

वंचित आघाडीशी युती तुटल्यानंतर एमआयएम स्वबळावर महाराष्ट्रात पहिलीच लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना बडेभाई मानणाऱ्या ओवेसी यांनी मनात कुठलीही अढी न ठेवता अकोला लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) त्यांना पाठिंबा जाहीर केला.

याआधीच 'एमआयएम'ने अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने न मागता पाठिंबा देण्याची एमआयएमची ही राजकीय खेळी त्यांना संभाजीनगरात वंचित समाजाची मते मिळवून देण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील निवासस्थानी गेल्या महिन्यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची भेट झाली होती. या वेळी दोघांनी सोबत भोजन घेत राजकीय विषयावर चर्चा केली.

त्यानंतरच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. याची अधिकृत घोषणा ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काल कन्नडच्या जाहीर सभेत केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरात झालेल्या सभेमध्ये इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर यांनादेखील अकोला लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी केली. त्याला ओवेसी यांनी आपल्या भाषणातून तत्काळ मान्यता देत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

एमआयएमची ही राजकीय खेळी अत्यंत चलाकीने करण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे (MVA) दलित समाजाची एक गठ्ठा मते इम्तियाज जलील यांना मिळाली होती.

या वेळी प्रकाश आंबेडकरांनी 'एकला चलो'ची भूमिका घेत मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) उमेदवार दिले आहेत. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना बसण्याची शक्यता आहे.

ओवेसी हैदराबाद सोडून तीन दिवस संभाजीनगर येथे ठाण मांडून होते. यादरम्यान त्यांनी मुस्लिम धर्मगुरू, दलित, वंचित समाजाच्या घटकांशी चर्चा करत भेटीगाठी घेतल्या. कुठल्याही परिस्थितीत इम्तियाज जलील (Imtiaz jalel) पुन्हा निवडून आले पाहिजे यासाठी 'एमआयएम'ने विशेष रणनीती आखली आहे.

अमरावतीत आनंदराज आंबेडकर व अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय हा याच रणनीतीचा एक भाग समजला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा संभाजीनगरात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनाही दलित समाजामध्ये मानाचे स्थान आहे.

या दोघांनाही पाठिंबा जाहीर करत त्यांना मानणाऱ्या समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना एमआयएमने पूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता. फक्त त्याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी केली.

मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या बाबतीत ऐनवेळी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर समर्थकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

'मान न मान मै तेरा मेहमान' याप्रमाणे 'एमआयएम'ने (MIM) प्रकाश आंबेडकरांना देऊ केलेला पाठिंबा संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या किती कामाला येतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु 'एमआयएम'ने या निमित्ताने एका वेगळ्याच धक्कातंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT