Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : संभाजीनगर वंचितच्या उमेदवाराला एबी फॉर्मच नाही; 'वंचित-एमआयएम'चं काय शिजतंय?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या ता. 25 रोजी शेवटची तारीख आहे. परंतु अद्यापही वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार अफसर खान यांना एबी फाॅर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या खान यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर करत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. (Lok Sabha Election 2024)

मला एबी फाॅर्म का मिळाला नाही? कोणाच्या सांगण्यावरून तो रोखण्यात आला हे मी 26 किंवा 27 रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन, अशी धमकी वजा इशारा अफसर खान यांनी दिला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुस्लिम व्हाेट बँकेला सुरुंग लावण्यासाठी वंचितने अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली होती. एका दिवसात पक्षप्रवेश आणि दुसऱ्या दिवशी थेट उमेदवारी जाहीर झाल्याने अफसर खान फॉर्मात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहर आणि जिल्ह्यात वंचितकडून (Vanchit bahujan Aghadi) उमेदवार म्हणून खान यांची प्रचाराला सुरुवात केली होती. दरम्यान, अफसर खान यांच्या उमेदवारीवरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. या पार्श्वभूमीवर अफसर खान यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला एक दिवस शिल्लक असताना पक्षाकडून एबी फाॅर्म देण्यात न आल्याने खान यांनी टोकाचा निर्णय घेत अपक्ष लढण्याची घोषणा केली.

माझ्यासोबत राहिलेल्या वंचित, वंजारी, ओबीसी समाज बांधवांनी मला पाठिंबा कायम ठेवावा, असे आवाहन अफसर खान यांनी केले. एबी फाॅर्म का मिळाला नाही? तुमची प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही चर्चा झाली का? या सगळ्या प्रश्नांवर नकारात्मक उत्तरे देत आपण अपक्ष लढणार आहोत, हे खान वारंवार सांगत होते.

एमआयएमने अकोल्यातून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने संभाजीनगरात एमआयएमला अघोषित पाठिंबा दिला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. वंचितकडून अफसर खान यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे का? याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला चोवीस तास राहिलेले असताना शेवटपर्यंत वंचित काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT