krushna ughade banner of sandipan bhumare at kedarnath  sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : भुमरेमामांच्या विजयासाठी पठ्ठ्याने थेट केदारनाथ गाठले

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 22 May : पाचवेळा पैठण विधानसभा मतदारसंघातून आमदार आणि दोन वेळा राज्याच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले संदीपान भुमरे यांनी यावेळी लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) आखाड्यात उडी घेतली. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीने त्यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांच्याशी त्यांची थेट लढत झाली.

मतदानानंतर कितीही आकडेमोड केली तरी ठामपणे कुठलाच पक्ष विजयाचा दावा करताना दिसत नाहीये. त्यामुळे समर्थकांची घालमेल वाढली आहे. अशातच संदीपान भुमरेमामांच्या विजयाचे साकडे घालण्यासाठी त्यांच्या एका समर्थकाने थेट केदारनाथ गाठले. तिथे बाबा केदारनाथाचे दर्शन घेत या पठ्ठ्याने संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांचे छायाचित्र असलेले बॅनर तिथे झळकवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समर्थकाचे हे प्रेम पाहून भुमरे चांगलेच भारावले. "या प्रेमाचा मी सैदव ऋणी राहीन," अशा शब्दांत त्यांनी या चाहत्याचे आभार मानले. राजकारणात कुठल्याही नेत्यासाठी त्याचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा जीव की प्राण असतो. या दोघांचे ऐकमेकांवर जीवापाड प्रेम असते. त्यामुळे नेता मोठा होतो तेव्हा अनेक समर्थक कार्यकर्त्यांचेही चांगभलं होतं. त्यामुळे आपला नेता कायम सत्तेत असला पाहिजे यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांची काही कमी नाही.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात नेत्यासाठी वणवण फिरणारे त्यांचे समर्थक त्यांच्या विजयासाठी काय काय करतील? याचा नेम नसतो. राजकारणात अमूक एखाद्या नेत्याला आमदारकी, खासदारकीचे तिकीट मिळावे, तो मंत्री व्हावा, निवडून यावा यासाठी त्यांचे समर्थक नवस बोलता, पायी वारी करतात, लोटांगण घालतात, चप्पल घालणे सोडून देतात, मुंडण करतात अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात.

असाच नवस, साकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृष्णा पाटील उघडे या तरुणाने आपल्या नेत्यासाठी घातले आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान पार पडले. आता चार जून रोजी प्रत्यक्ष निकाल लागणार आहे. निकालाला बराच अवधी असल्यामुळे निवडणुकीत राबलेले पदाधिकारी, नेते सहलीवर जात आहेत. कृष्णा उघडे याने मात्र संदीपान भुमरे हे निवडणुकीत विजयी व्हावेत, यासाठी थेट केदारनाथला जाऊन महादेवाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला अन् थेट केदारनाथ गाठले.

इथे महादेवाचे दर्शन घेत आपल्या नेत्याच्या विजयासाठी प्रार्थना केली. सांगून कोणाला विश्वास बसणार नाही म्हणून कृष्णाने दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिरासमोर उभे राहून संदीपान भुमरे यांचा फोटो असलेले बॅनर झळकवत त्याच्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. अर्थात हा व्हिडीओ त्याच्या नेत्यापर्यंत म्हणजेच संदीपान भुमरे यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांनी कृष्णा उघडेचे आभार मानले. सध्या या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT