लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) तयारीत नेहमीच पुढे असणाऱ्या भाजपने एक पाउल पुढे टाकत मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांना मैदानात उतरवले आहे. हिंगोली, परभणी व नांदेड या लोकसभा मतदारसंघात तयारीचा आढावा घेण्यासाठी ते मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.
महायुतीचे जागावाटप अद्याप ठरले नसल्यामुळे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत. मात्र, भाजपनं ( Bjp ) लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयारी सुरु केली आहे. लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख, समन्वयक नियुक्ती, बूथ स्तरावरील आढावा बैठका व नुकतेच पार पडलेले 'गाव चलो अभियान' यामुळे भाजप जोमात असल्याचे दिसून येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना ( shivsena ) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Ncp ) अद्याप फारशा हालचाली दिसून येत नाहीत. भाजपनं मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांना जबाबदारी दिली असून ते हिंगोली, परभणी आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेत आहेत. शिवसेना भाजप-युती असताना परभणी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असायचे.
परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना उबाठा गटात असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. त्यामुळे परभणीच्या राजकीय इतिहासात भाजपला पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली आहे. पक्षाने त्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. पण, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही परभणी लोकसभा मतदारसंघाची आग्रही मागणी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच परभणीचा दौरा करून पक्षकार्याचा आढावा घेतला. भाजपकडून अद्यापपर्यंत कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचा दौरा झाला नव्हता. त्यामुळे पक्षाने परभणी लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडला की काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, राजस्थानचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांना पक्षाने हिंगोली आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी पाठवल्याने इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार असल्याने महायुतीच्या जागावाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण, भाजपनंही हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी पूर्ण तयारी केली आहे.
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील सुमठानकर यांची लोकसभा समन्वयकपदी, तर रामराव वडकुते यांची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. देवडा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत असल्याने हिंगोलीच्या जागेवर भाजपने आपला दावा अधिक मजबूत केला आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.