Maharashtra Political : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सागर बंगला खूपच चर्चेत आला आहे. याच बंगल्यात राहणाऱ्या नेत्यावरील आरोपामुळे 25 फेब्रुवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलताना भान राखणे महत्त्वाचे असते, याची जाणीव झाली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील सागर या बहुचर्चित बंगल्याकडे जायला निघाले. तत्पूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या अनुषंगाने अजितदादांनी जरांगे यांना सुनावले. काही दिवसांपूर्वी सागर बंगल्याचा उल्लेख करत एका भाजप नेत्याने थेट पोलिसांनाच दमदाटीची भाषा वापरली होती. (Maharashtra Politics)
फडणवीस यांनी मला सलाइनमधून विष देण्याचा प्रयत्न केला, असा खळबळ माजवणारा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर अजितदादा बोलत होते. प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, आपण काय बोलतोय, कुणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलतोय याचे भान राखले पाहिजे, असेही अजितदादा म्हणाले. अजितदादा जे बोलले ते अगदी योग्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भान न राखता काही वक्तव्ये केली आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझे कुणीच काही बिघडवू शकत नाही, असा त्यांचा अविर्भाव असतो. सोलापुरात बोलताना त्यांनी असेच बेताल वक्तव्ये केली होती. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये ते सातत्याने करत आहेत. आमदार राणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तेथील पोलिस आयुक्तांची बदली झाली होती. कदाचित हा योगायोग असावा.
आमदार राणे हे पोलिसांवर दबाव टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, कारण सागर बंगल्यावर माझा बॉस बसलेला आहे, असे ते जाहीर सभेत म्हणाले होते. पोलिस माझ्या सभेचे व्हिडिओ शूटिंग करतील आणि ते आपल्या पत्नींना दाखवतील, असेही ते म्हणाले होते. या वक्तव्यावर पोलिस पत्नींनी आक्रमक होत मुंबई पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन राणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाचे नाव सागर असे आहे. सागर बंगल्यावर माझा बॉस बसला आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस बसले आणि त्यांच्याकडून मला संरक्षण मिळते, असा संदेश आमदार राणे पोलिसांना देत असतात. आपण काय बोलतोय आणि कशाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवले पाहिजे, असे त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे यांनाही खडसावले असते तर...!
तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह 25 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त मीरा रोड येथे आले होते. काही दिवसांपूर्वी मुबंईतील या भागात दंगल झाली होती. आमदार टी. राजा यांनी लौकिकानुसार तेथेही चिथावणीखोर, वादग्रस्त वक्तव्य केले. मला रोखण्यासाठी काही शक्तींनी खूप प्रयत्न केले. मात्र, ते निष्फळ ठरले. देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा संकल्प घेऊनच मी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार टी. राजा यांना राज्यघटना मान्य नाही का, असा प्रश्न आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पडला नाही. टी. राजा यांनी लव्ह जिहाद, गोहत्या या मुद्द्यांचाही उल्लेख केला. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू आहे. भाजपची सत्ता असलेल्या शेजारच्या गोवा राज्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा टी. राजा यांनी एकदा घ्यायला हवा.
सरकार सर्वांचे असते, त्यांना मतदान न करणाऱ्यांचेही असते. आपला अजेंडा दामटण्यासाठी, मतांचे राजकारण करण्यासाठी समाजात दहशत पसरवू पाहणाऱ्या नेत्यांना पाठीशी घातले जात असेल तर सरकारच्या हेतूविषयी, निपःक्षपातीपणाविषयी शंका निर्माण होते.
सर्वांना समान वागणूक देण्याची शपथ मंत्र्यांनी घेतलेली असते. त्याचा त्यांना विसर का पडत असेल, याचा विचार समाजाने करायला हवा. प्रचारकी मुद्द्यांना बळी न पडता आपल्या कामाच्या, गरजेच्या मुद्द्यांवर नागरिकांनी कोणत्याही सरकारला जाब विचारणे सुरू केल्याशिवाय ही परिस्थिती बदलू शकणार नाही, हे निश्चित आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.