Raosaheb Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : घटना बदलाच्या चर्चेवर दानवे म्हणतात, "सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत हा देश संविधानावर..."

Raosaheb Danve News : बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या शिकवणीवरच देशात अनेक तरुण वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133 वी जयंती. या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा देताना हा देश संविधानावर चालतो आहे आणि भविष्यात आकाशात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत संविधानावर चालेल, असा विश्वास व्यक्त केला. (Latest Marathi News)

देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी 'अबकी बार 400 पार'चा नारा दिला आहे. यावरून इंडिया आघाडी व इतर विरोधकांनी भाजपच्या 'चारसो पार'च्या नाऱ्या मागे मोठे राजकारण असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

400 खासदार निवडून आणत भाजपला देशाची घटना बदलायची आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपच्याच एका मंत्र्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी देश भविष्यातही संविधानावरच चालणार, असा विश्वास व्यक्त करणारे विधान केले आहे.

रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीच्या पाचही निवडणुकीत ते विजयी झाले. पक्षाने सहाव्यांदा त्यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक प्रचारामध्ये मराठा आरक्षण (Maratha Reservation) , घटना बदल या मुद्द्यांवरून विरोधक दानवे यांना टार्गेट करत चारसौ पारच्या घोषणेचा संबंध थेट घटना बदलाशी जोडत आहेत. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून स्पष्टीकरण देताना त्यांची दमछाक होत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपली भूमिका स्पष्ट करण्याची चालून आलेली संधी हेरली.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या शुभेच्छांमधून भाजप पुन्हा सत्ता आली तर घटना बदलेल या अपप्रचाराला प्रत्युत्तर दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या शिकवणीवरच देशात अनेक तरुण वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT