Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah Rally News : छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपाच लढवणार, अमित शाहांचे स्पष्ट संकेत!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency News :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपाच लढवणार याचे स्पष्ट संकेत मंगळवारी झालेल्या सभेतील भाषणातून दिले आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासा्ठी संभाजीनगरातून एक कमळ देणार का? असा सवाल करत त्यांनी सभेला उपस्थितीत जनसमुदायाकडून भाजपाचा खासदार निवडून देण्याचा शब्दही घेतला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीतील कोणता पक्ष लढवणार? याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेऊन फोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून ही जागा भाजपा लढवणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. एवढेच नाही तर अमित शाह(Amit Shah) सभेत उमेदवाराबद्दलचे काही संकेत देतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. शाह यांनी उमेदवार कोण असेल? याचा सस्पेंस कायम ठेवला असला तरी संभाजीनगरची जागा भाजपाच लढवणार, हे मात्र स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाषणाची सुरुवात करतानाच शाह यांनी संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) वालो की आवाज को क्या हुआ असा सवाल करत मजलिस को उखाडने का संकल्प लिजीए, असे आवाहन करत एमआयएमवर निशाणा साधला. सभेला गर्दी झाल्यामुळे शाह खूष झाल्याचे दिसून आले, त्यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात करत शहरवासीयांचे आभारही मानले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातून पहिल्यांदा लढण्याची संधी भाजपाने घेतली आहे, हे शाह यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

संभाजीनगर लोकसभेची जागा आमची आहे, आम्हीच ती लढवणार, असा दावा काही महिन्यापुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार, प्रवक्ते माध्यमांसमोर करत होते. परंतु अचानक हे दावे थांबले, तेव्हापासूनच ही जागा भाजपा(BJP) लढवणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अमित शाह यांच्या आजच्या सभेने आणि त्यांनी संभाजीनगरातून मोदींच्या खासदारांमध्ये एक कमळ निवडून पाठवणार ना? या आवाहनानंतर ही जागा भाजपच लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आता उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांनी संभाजीनगरची जागा कोण लढणार याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला येणाऱ्या काळात उधाण येणार आहे. शाह यांनी आपल्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचा उल्लेख करत इंडिया आघाडीवर हल्ला चढवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT