नांदेड : 5 मार्च | वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aghadi ) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) दररोज आपल्या भूमिका बदलत आहेत. कधी ते आपल्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका म्हणून सांगतात, तर कधी परस्पर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून टाकतात. त्यांच्या या तळ्यात मळ्यातच्या भूमिकेने महाविकास आघाडी विशेषतः नांदेडात काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. आधीच अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ स्वीकारल्याने पक्ष अडचणीत आला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेस नामशेष करण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असताना वंचित बहुजन आघाडीच्या धरसोड वृत्तीमुळे काँग्रेसचे स्थानिक आणि राज्य पातळीवरचे नेतेही हैराण झाले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचितच्या भरवशावर काँग्रेस अशोक चव्हाणांना ( Ashok Chavan ) नांदेडमध्ये धडा शिकवण्याची तयारी करत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, वंचित अजूनही स्वतःला महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aghadi ) भाग समजायला तयार नाही. अशावेळी काँग्रेसला नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना रोखणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शिल्लक काँग्रेसची ( Congress ) मोठी गोची झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. हे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे, तरी काही जागांचा तिढा अजून कायम असल्याचे बोलले जाते. नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार आहे, असे निश्चित मानले जाते.
पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात असून, अनेक इच्छुकांनी लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे नेत्यांकडून सांगितले जाते. काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकेल असा उमेदवारही शोधेल, पण वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे सध्या पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेसला हमखास विजय मिळवून देणारा म्हणून ओळखला जातो. मात्र, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने ही ओळख जपण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'च्या युतीमुळे काँग्रेसने नांदेडची जागा गमावली होती. वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मते येणाऱ्या निवडणुकीतही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीबरोबर राहावी, यासाठी काँग्रेस सुरुवातीपासूनच आग्रही आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या महिन्यात संयुक्त पत्र काढून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याचे जाहीर केले होते. तसेच वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हजेरी लावून त्याला दुजोरा दिला होता.
परंतु, कालांतराने प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका आणि मागण्या बदलल्या. यात 15 ओबीसींना उमेदवारी, तीन अल्पसंख्याकांना निवडणुकीचे तिकीट अशा अनेक अटी टाकल्या. याशिवाय राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील स्वतःसह उमेदवारीही जाहीर करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार? की महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून याबद्दल अजूनही साशंकता आहे.
नांदेडची जागा पुन्हा जिंकायची असेल तर वंचित सोबत असणे आवश्यक आहे. जर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर नांदेडला काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. जी मतं वंचितला मिळाली होती ती काँग्रेसची पारंपरिक मतं होती, असे मानले जाते. ही मतं काँग्रेसला मिळाली तरच परिस्थिती बदलू शकते, अन्यथा काँग्रेसच्या नशिबी नांदेडमध्ये सलग दुसरा पराभव येऊ शकतो.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.