Sushma Andhare, Sanjay Jadhav, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : परभणीतील ठाकरे गटाचे वारे; प्रचारात सर्वांच्या पुढे

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News :

सर्व राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी उमेदवार कामाला लागले आहेत. नेहमीच इलेक्शन मोड असणाऱ्या भाजपने रणशिंग फुंकले असून 'गाव चलो' अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात संपर्क केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटात (Shivsena) शांतता दिसून येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट एकदम सक्रिय झालेला दिसून येत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. जाधव आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ दिली.

परभणीतील (Parbhani) मतदारांनी पक्षबदल केलेल्या शिवसेना नेत्यांना नाकारले आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी पक्षनेतृत्व निश्चिंत असल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झालेले नाही.

मात्र जेथे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी त्या घटकपक्षाला प्रथम प्राधान्य देण्याचे सूत्र असल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. त्यानुसार परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे.

सुषमा अंधारे यांनी मुक्तसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रवास करत शिवसैनिकांशी संवाद साधला. हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा तर तिसऱ्या टप्प्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दौरा होणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. 12 फेब्रुवारीला मानवत येथे महाविकास आघाडीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ. फौजिया खान आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद तसेच आमदार सुरेश वरपूडकर, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक उपस्थित असणार आहेत.

शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे दोन खासदार, दोन आमदार असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटाला साथ दिल्याने महायुतीमध्ये असणाऱ्या आमदारांच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT