Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : 'अरे गड्याहो बिस्कीट खा अन् मला मतदान करा..!'; रावसाहेब दानवेंच्या प्रचाराचा फंडाच भारी

Tushar Patil

Bhokardan Political News : लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) उमेदवार जाहीर होण्याआधी म्हणजे तब्बल दोन आठवड्यापासून दानवेंचा मतदारसंघाच प्रचार सुरू आहे. त्यांच्या या प्रचारात अनेक गंमती जंमती घडताना दिसत आहेत. आधीच आपल्या ग्रामीण भाषा, पेहरावर आणि साध्या राहणीमानामुळे दानवे केवळ मतदारसंघातच नाही, तर मराठवाड्यात अन् राज्यात ओळखले जातात.

अशाच एका गावातील प्रचारा दरम्यान, त्यांनी ` अरे गड्याहो बिस्कीट खा, अन् मला मतदान करा`, असे आवाहन केले. या आवाहनात एक किस्सा दडलेला आहे. त्याचे झाले असे प्रचाराच्या निमित्ताने दानवे भोकरदन तालुक्यातील अनवा येथून जळगाव सपकाळ गावाकडे जात असताना त्यांना भूक लागली. पण कमी वेळात जास्त प्रचार सभा, बैठका आणि भेटीगाठी घ्यायच्या असल्याने त्यांनी जेवणात अधिक वेळ जाईल म्हणून बिस्कीटचा पुडा आणायला लावला.

गाडीत बसून बिस्कीट खातखातच गाव आल्यावर ते पुडा घेऊन गाडीतून खाली उतरले. जळगाव सपकाळ येथे आयोजित बैठकीला आश्रम शाळेच्या पटांगणात पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची वाट पाहतच होते. घाईघाईत दानवेंनी माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरवात केली. समोर दोन सेवानिवृत्त शिक्षक नंदाराम सपकाळ आणि कडूबा सपकाळ हे बसले होते. जुना परिचय असल्याने ते दानवेंना पाहून ताडकन उठले.

मग रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) या दोघा जेष्ठ कार्यकर्त्यांकडे आपला मोर्चा वळवला आणि हातात असलेल्या पुड्यातील दोन बिस्कीटं काढत दोघांना दिली आणि ती खाण्याचा आग्रह केला. स्वतः दानवेंनी आपल्याला बिस्कीट दिले म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. या आनंदाच्या ओघाचा दादा आमच यंदाच शेवटच मतदान आहे, ते आम्ही तुम्हालाच करणार असं या दोघांनी सांगून टाकलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर दानवेंना काही सुचले नसेल तर नवलच. मिश्किल टोलेबाजीत हातखंडा असलेल्या दानवेंनी या दोघांना दोन बिस्कीट खाऊ घातले, पण आपल्या पुढच्या निवडणुकीच्या मतदानाची हमीही घेतली. गड्याहो पुढच्या मतदाना पर्यंत तुम्ही जगशाल, बिस्कीट खा !अन तंदुरुस्त रहा, अशा शब्दात दोघांना शुभेच्छा आणि पुढच्या निवडणुकीसाठी आपली दोन मत फिक्स करून टाकली.

दानवेंचा हा हजरजबाबीपणा पाहून उपस्थितांनी त्यांना चांगलीच दाद दिली. यानंतर दानवेंनी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व आश्रम शाळेच्या पटांगणातच डब्बा खाल्ला व पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. गावात मात्र त्यांच्या बिस्कीटाची चर्चा चांगलीच रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT