Hingoli News : हिंगोली लोकसभेची जागा कोण लढवणार? विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम राहणार, की कापली जाणार? या चर्चा सुरू असताना काल (ता.10) हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीशीच उभे होते.
हिंगोली जिल्ह्यात मंजूर झालेले प्रकल्प, हळद संशोधन केंद्र व इतर मागण्यांची आठवण हे दोघेही सातत्याने मुख्यमंत्र्यांना करून देत होते. राज्यात महायुतीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपचे सरकार आहे. पण हिंगोलीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला फक्त मुख्यमंत्रीच आले होते. त्यातही शिंदेंनी राज्यातल्या सरकारचा एकदा नव्हे तर दोन वेळा डबल इंजिनचे सरकार असा उल्लेख केला. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अजित पवारांना विसरले का? अशी चर्चा सुरू होती.
कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर टीका केली. पण ती करताना त्यांनी केलेले अश्लील हावभाव याबद्दल तीव्र नापसंती दर्शवली गेली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी बांगर-हेमंत पाटील हे भाषण संपेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. बांगर निश्चिंत तर हेमंत पाटील यांच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव जाणवत होता. उमेदवारी निश्चित नसल्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्र म्हणेपर्यंतही पाटील यांच्या उमेदवारीचे कुठलेही संकेत दिले नाही. त्यामुळे हेमंत पाटील (Hemant Patil) कमालीचे नाराज झाले असणार. लोकसभा निवडणुकीत परीक्षा हेमंत पाटलांची असल्यामुळे आमदार संतोष बांगर मात्र बिनधास्त दिसले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमातून खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांना किती बळ मिळते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर शिवसेना नेतृत्वाकडून गद्दारीचे आरोप करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच खोके आणि बोके अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात येत होत्या. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना अनेकदा आपली भूमिका मांडली. अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाषणांमध्ये आपल्या बदललेल्या राजकीय भूमिकेबद्दल स्वतःची बाजू मांडली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला नि:संकोचपणे समर्थन दिले.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जरा उशिराने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाची पूर्वतयारी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाला मतदारांचा कौल आहे किंवा नाही याचा निर्णय लवकरच लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हेमंत पाटील यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साथ दिलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी मिळेल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याने मलाच उमेदवारी मिळेल, असा दावा हेमंत पाटील वारंवार करत आहेत. पण त्यांच्या दाव्याची पुष्टी काल हिंगोलीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी काही केली नाही. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येक वेळी नवीन उमेदवाराला संधी दिली आहे. हा इतिहास पाहता महायुती हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी देऊन मैदानात उतरवण्याची जोखीम घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे असेल, अशी शक्यता आहे. मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असले तरी ठाकरे गटाला मोठी सहानुभूती मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हिंगोली, कळमनुरी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महायुतीमध्ये आहेत. शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्याचाही फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.