Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Shivsena (UBT) News : अंबादास दानवेंचा 'जनाधिकार' की लोकसभेसाठी 'जनाधार' ?

Political News : जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी हा जनाधिकार कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते.

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagar News : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनाधिकार मोहिम हाती घेतली आहे. बुलडाण्यातून या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर उद्या (ता.19) छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळच दानवे लोकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निरसन करणार आहेत. जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी हा जनाधिकार कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे (ambadas Danve) यांचा हा जनाधिकार कार्यक्रम म्हणजे जनाधार मिळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चाही या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या दानवे यांचा हा जनाधिकार कार्यक्रम त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 2019 च्या निवडणुकीतही दानवे यांना लोकसभा लढवण्याची इच्छा होती, पण चंद्रकांत खैरे सलग तीनवेळा निवडून आलेले असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच उमेदवारी दिली.

खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून साडेचार हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान राज्यात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आणि जिल्ह्यातील राजकीय गणितही बदलले. शिवसेनेत पडलेली फूट, निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतेच केलेले शिक्कामोर्तब याचा मोठा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठी सहानुभूती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत, दिल्लीत जाण्याचा अंबादास दानवे यांचाही प्रयत्न आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrkant khaire) आणि अंबादास दानवे या दोघांनीही उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे दावा केल्याचे काही लपून राहिलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत गटबाजीचे जाहीर प्रदर्शन नको, असे सांगत ठाकरे यांनी तुर्तास खैरे-दानवे यांच्या समेट घडवून आणली आहे. खैरे यांची जिल्ह्यात स्वतंत्र तयारी सुरू आहे, तर दानवे यांनीही लोकसभा निवडणुक प्रचारासाठी खास सुसज्ज अशी व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेत, उमेदवारीच्या स्पर्धेत आपणही आहोत हे दाखवून दिले. त्यानंतर आता जनाधिकार कार्यक्रमाच्या माध्यमातूनही दानवे यांचा लोकसभेसाठी जनाधार मिळवण्याचा प्रयत्न दिसतो.

एकाच दिवसात तीन विधानसभा मतदारसंघात बैठका

गुरुवारी एकाच दिवसात दानवे यांनी जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि कन्नड अशा तीन विधानसभा मतदारसंघात जाऊन बैठका आणि आढावा घेतला. उद्या, शहरातून ते जनाधिकार कार्यक्रमाला सुरूवात करणार आहेत. त्याचा हा वेग पाहता, पक्षप्रमुखांकडून दानवे यांना लोकसभा उमेदवारी संदर्भात काही संकेत तर मिळाले नाहीत ना? अशी चर्चाही होतांना दिसत आहेत.

Edited by: Sachin Waghmare

SCROLL FOR NEXT