MLA Ratnakar Gutte and Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

MLA Ratnakar Gutte : परभणीतून लढण्याचा जानकरांचा निर्धार; गुट्टेंसाठी इकडे आड तिकडे विहीर

Prasad Shivaji Joshi

Parbhani News: लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रादेशिक राजकीय पक्षाकडून स्वतःचे राजकीय मूल्य वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. महायुतीमधील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसताना युतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. (Lok Sabha Election 2024 )

विशेषतः गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार 'रासप'चे रत्नाकर गुट्टे यांची इकडे आड तिकडे विहीर, अशी स्थिती झाली आहे. गुट्टे यांचे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी निकटचे संबंध असल्याचे त्यांच्या जाहीर वक्तव्यातून समोर आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गंगाखेड येथे आले असताना त्यांनी गुट्टे हेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे सांगितले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या परभणी जिल्ह्यातील प्रत्येक दौऱ्यात गुट्टे सहभागी झालेले आहेत. दुसरीकडे गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षात आहेत.

पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीच्या जागावाटपापूर्वीच परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे महायुतीची अडचण झाली आहे. विशेषतः गुट्टे यांची कोंडी होतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी परभणी जिल्ह्यात महायुतीची पत्रकार परिषद संपन्न झाली तसेच कार्यकर्ता मेळावा सुध्दा झाला. मात्र आमदार गुट्टे या दोन्ही कार्यकर्मात अनुपस्थित होते.

रासप हा महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष आहे. मात्र भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे गुट्टे महायुतीच्या कार्यक्रमापासून लांब असल्याचे बोलले जात आहे. मुरकुटे व गुट्टे यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. जाहीर कार्यक्रमामधून दोघांनी परस्पराविरुद्ध आरोप प्रत्यारोप केले आहेत.

दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सध्यातरी यशस्वी होताना दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे व गुट्टे यांच्यातील राजकीय वादाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT