Dharashiv News : माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे स्वप्न असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी त्यांचे पुत्र भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जोर लावला आहे. सत्ताधारी पक्षासोबत गेल्याशिवाय जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी पक्षांतराची मोठी जोखीमही पत्करली, पण त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हे आता समोर येऊ लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांकडून या योजनेला होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी त्यांना बळ दिले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्प योजनेला नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता देत तब्बल 11 हजार 600 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. आता मराठवाड्याच्या दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील पाच महिन्यांत कृष्णा नदीचे पाणी तुळजाभवानीच्या चरणी पोहोचेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी व्यक्त केला आहे. महायुती सरकारने आजवरच्या इतिहासात सर्वाधिक निधी दिल्याचेही पाटील यांनी सांगितले. दुष्काळी मराठवाड्याची ओळख पुसण्यासाठी मागील दोन तपापूर्वी सुरू झालेल्या कृष्णा-मराठवाडा योजनेला मूर्त रूप आले आहे. राज्य सरकारने गतवर्षी 11 हजार 726 कोटी रुपये निधी खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर खर्या अर्थाने कृष्णा- मराठवाडा योजना क्र. 1 आणि 2 च्या टप्प्यातील कामे प्रगतिपथावर आली आहेत.
जवळपास 70 टक्के कामे पूर्ण झाली असून, घाटणे बॅरेजपासून पुढे तुळजापूरच्या रामदरा तलावापर्यंत 63 किलोमीटरचे काम पुढील पाच महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 2 अंतर्गत सुरू असलेल्या घाटणे, पडसाळी ते रामदरा तलावापर्यंतच्या विविध कामांचा माध्यम प्रतिनिधींसमवेत नुकताच पाहणी दौरा झाला.
घाटणे बॅरेजपासून तुळजापूरच्या रामदरा तलावापर्यंतचे 63 किलोमीटर अंतराचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ यंत्रणेने ठेवले आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर असून, या ठिकाणी 84 एचपीचे चार पंप बसविण्यात येणार आहेत. सीना नदीपात्रात वेगवेगळ्या पाणीस्रोतातून जमा होणार्या 2.24 टीएमसी पाणी उचलून ते सीना कोळेगाव धरण अधोबाजून गुरुत्वीय बंद नलिकेद्वारे सीना नदीत सोडून पुढे हेच पाणी कॅनॉल आणि आवश्यक त्या ठिकाणी बंद नलिकेद्वारे पाणी उचलून तुळजापूरच्या रामदरा तलावात साठवले जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
योजना क्र. 2 अंतर्गत करण्यात येणार्या बॅरेज, बंद नलिका आणि कॅनॉलसाठी 609 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पावसाळ्यातील 75 दिवस हे पाणी उचलून रामदरा तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुळजापूर, लोहारा, उमरगा या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कामांना प्रारंभ होणार आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 1 व 2 साठी सन 2023-24 मध्ये 334.75 कोटी, तर कृष्णा मराठवाडा लिंक-5 करिता 225 कोटी, असे एकूण 559.75 कोटी रूपयांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद धाराशिव जिल्ह्याकरिता आहे. मागील शिल्लक 38.21 कोटी व केंद्रीय अर्थसहायातील 75 कोटी, असे मिळून 672.96 कोटींचा निधी चालू वर्षात उपलब्ध झाला आहे. एकंदरीत धाराशिव जिल्ह्याला दुष्काळी संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत दरवर्षी होणार्या अतिवृष्टीमुळे तिथे महापूर येतो. मोठ्या प्रमाणात पाणी समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळू शकते. त्यासाठी महायुती सरकार जागतिक बँकेच्या अर्थसहायातून महत्त्वपूर्ण योजना राबवित आहे. पुढील आठवड्यात जागतिक बँकेची टीम प्रकल्पाच्या पाहणीसाठी जिल्हा दौर्यावर येणार आहे. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर परिसरातील पाणी लिफ्टिंग करून ते मराठवाड्यात आणल्यास मराठवाड्याच्या सिंचनक्षेत्राचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
(Edited by Sachin Waghmare)