Chh Sambhajinagar : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. टपाल मतपत्रिकांच्या मोजणीत पाटील यांनी 325 मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा कल अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसल्याने अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या मतदारसंघात महायुतीचे सतीश चव्हाण, महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील आणि शिवसेनेचे दिलीप घुले यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यामुळे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
मतमोजणी केंद्रावर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “मराठवाडा पदवीधरच्या मतदारांची ताकद, लोकशाहीवर निष्ठा, विचार करून पदवीधरांनी मतदान केले आहे. महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने निवडणुकीत उतरली होती. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली हे आपण पाहिले. आम्ही व्हिजन घेऊन उतरलो होतो, संधी मिळाल्यानंतर सहा वर्षात काय करणार हे आमच्या जाहीरनाम्यात सांगितले होते. विरोधपक्षावर आम्ही कुठेही टीका केली नव्हती.”
या निवडणुकीसाठी एकूण 3,26,700 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 1,91,689 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 59.12 इतकी होती. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांत असलेल्या 842 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 41 उमेदवार होते.
मतमोजणीसाठी 70 टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, 13 प्राथमिक फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी करून अवैध मतपत्रिका बाजूला काढल्या जातील. त्यानंतर वैध मतपत्रिकांवरील पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल.
आवश्यक मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्यास नियमानुसार कमी मते मिळवणाऱ्या उमेदवारांना बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते हस्तांतरित केली जातील. आवश्यक कोटा पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे नाव जाहीर होईल.