

पुण्यातील पदवीधर मतमोजणी केंद्रावर 8 मतपेट्यांचे सील तुटलेले आढळल्याचा आरोप करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतमोजणी सुरू असताना हा प्रकार निदर्शनास आल्याने महाविकास आघाडीसह विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. संबंधित मतपेट्या बाजूला ठेवून या प्रकरणाची चौकशी करावी आणि मतमोजणी पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी प्रतिनिधींनी केल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी मतमोजणी केंद्रावर प्रक्रिया नियमानुसार सुरू झाली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना दिल्यानंतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतपेट्या टेबलवर आणण्यात आल्या. त्यानंतर काही मतपेट्यांवरील तारेची सील तुटलेली, तर लाखेची सील निघालेली असल्याचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आले.
हा प्रकार पाहताच प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला. मात्र, अधिकाऱ्यांनी कागदी सील व्यवस्थित असल्याचे सांगत मतमोजणी सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याचा दावा प्रतिनिधींनी केला आहे. या प्रकरणी लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सुरुवातीला तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 6 ते 8 मतपेट्यांच्या सीलमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या मतपेट्यांमध्ये नेमकी कोणाची मते आहेत, हे स्पष्ट नसल्याने सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या मुद्द्यावर एकत्रित आक्षेप घेतला. निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवारांच्या नावावर निवडणूक लढवली जात असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण मतमोजणी थांबवण्याची मागणी नसून, ज्या मतपेट्यांचे सील तुटलेले आढळले आहे, त्या स्वतंत्र ठेवून उर्वरित मतमोजणी सुरू ठेवावी, अशी भूमिका प्रतिनिधींनी मांडली आहे. तसेच या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, ते कधी उपलब्ध होणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, मतमोजणी केंद्रात मोठा गोंधळ नसून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सील तुटलेल्या मतपेट्यांच्या मुद्द्यावर निवडणूक प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोग काय निर्णय घेतो आणि तक्रारीची दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.