Nagpur News : राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फोडला त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारानी बंड केले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी अजित पवार यांच्यासह 40 आमदार गेले तर लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय आमदार भाजपच्या गळाला लागले. त्यातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा भूकंप होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या भाकीतामुळे आता कोणता पक्ष फुटणार? याची उत्सुकता लागली आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांवर डाव टाकत असून आगामी आठ दिवसात मोठा भूकंप बघायला मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पाटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केला आहे. भाजपचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले आहे. आताही भाजप आपल्यास मित्रपक्षांवर डाव टाकत असल्याचे स्पष्ट करीत आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच 'ऑपरेशन लोटस' पूर्णत्वास जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सर्वाना उत्सुकता लागली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक बडे नेते, आमदार आणि खासदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसातील भाजपचा इतिहास पहिला तर त्यांनी मित्र पक्षांना संपविण्याचे काम केले आहे. हा भाजपचा इतिहासच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशभरातील भाजपच्या मित्र पक्षांचे काय झाले यावर नजर टाकल्यास एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फार काही भवितव्य दिसत नाही. त्यांचे नेते भाजपमध्ये गेले तर नवल वाटण्याचे कारण नाही. याची सुरुवात झाली आहे, असे झाल्यास राज्यात यापुढे भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील", असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
दोन पक्षाचा भाजप गेम करणार
येत्या काळात भाजपकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा गेम केला जाणार असल्याचे मी आधीच बोललो होतो. आणखी मोठा खेळ शिल्लक आहे. फक्त आठ दिवस थांबा हे तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राची जनता भाजपच्या या खेळाला कंटाळली आहे. त्यांना पुन्हा सत्तेवर काँग्रेस हवी आहे. मात्र, त्यासाठी सरकारने बॅलेटवर मतदान घेतले पाहिजे. असेही नाना पाटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.