Maharashtra School Hindi Third Language Controversy News Sarkarnama
मराठवाडा

Marathi-Hindi Language News : महाराष्ट्राच्या माथी हिंदी सक्ती लादण्याची लबाडी मुख्यमंत्र्यांनी करू नये!

CM Urged Not to Impose Hindi on Maharashtra : या सक्तीचा आदिवासी, भटके -विमुक्त यांच्यावर काय परिणाम होणार याचा विचार न करता महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचे असंवैधानिक प्रयत्न चालू आहेत.

Jagdish Pansare

K. E. Haridas News : आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी भाषेच्या सक्तीला आहे‌. हा भाषिक संघर्ष नाही तर राजकीय संघर्ष आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेचं ओझं का घेतलं? असा सवाल, विद्रोही साहित्य चळवळीचे निमंत्रक के. इ. हरिदास यांनी केला. अशाप्रकारे भाषा लादता येणार नाही, भाषेच्या निमित्ताने आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हिंदी सक्ती नको. या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठी भाषा व संस्कृती संरक्षण परिषद घेणार असल्याचे हरिदास म्हणाले.

राज्यात मराठी (Marathi) विरुद्ध हिंदी भाषेचा वाद टोकाला गेला आहे. हिंदी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याच्या विरोधात मराठी लोक, साहित्यिक, लेखक आणि राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाल्या होत्या. वाढता रोष पाहता राज्यातील महायुती सरकारने माघार घेत हिंदी भाषे संदर्भातील अद्यादेश मागे घेतला. त्यानंतर मराठी विरुद्ध हिंदी हा वाद काहीसा शमला आहे. परंतु या विषयाची धग अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मराठी भाषा व संस्कृती संरक्षण परिषदेचे आयोजन केले जात आहे.

चळवळीचे कार्यकारी संघटक किशोर ढमाले, महासचिव सुभाष महेर, भाऊ पठाडे यांनी या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. जातीच्या उतरंडीप्रमाणे भाषेची उतरंड कशाला असावी. (Devendra Fadnavis) जगभरात मराठी भाषेचे आदानप्रदान होत असताना हिंदी भाषेची सक्ती का? या सक्तीचा आदिवासी, भटके -विमुक्त यांच्यावर काय परिणाम होणार याचा विचार न करता महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचे असंवैधानिक प्रयत्न चालू आहेत.

मराठी ही ज्ञानभाषा हवी, शिवछत्रपतींनी आपला कारभार मराठी भाषेतच केला होता. मराठी भाषेवरचे आक्रमण संस्कृतीवरचे आक्रमण आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन जीआर मागे घेतले तरीही तिसऱ्या जीआरनुसार नरेंद्र जाधव समिती नेमून हिंदी भाषा सक्तीची टांगती तलवार कायम ठेवलीच आहे. बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र धुडकावून महाराष्ट्राच्या माथी हिंदी सक्ती लादण्याची लबाडी चालूच असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठी भाषा व संस्कृती संरक्षण परिषदेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 ऑगस्टला ही परिषद होणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, संत नामदेव मंडप, गोविंद भाई श्रॉफ सभागृहात हिंदी भाषा सक्तीविरोधी लढ्याचे नेते डॉ. दीपक पवार ( मुंबई) हे परिषदेचे उद्घाटन करतील. चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी प्रमुख पाहुण्या असतील. 18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे अध्यक्षस्थानी असतील.

शिक्षणतज्ज्ञ एम. के. देशमुख स्वागताध्यक्ष असतील तर परिषदेला सतीश चकोर, अॅड.धनंजय बोर्डे, सूर्यकांताताई गाडे, नौशाद उस्मान, डॉ. अंजुम कादरी, आनंद भंडारे, भाऊसाहेब जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. परिषदेत भाषिक वर्चस्वाचे राजकारण या विषयावर प्रसिद्ध भाषातज्ञ डॉ.दिलीप चव्हाण (नांदेड) व इतिहासतज्ञ प्रा. देवेंद्र इंगळे (जळगाव) भाष्य करतील.

मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी शाळा,शैक्षणिक धोरण: स्थिती आणि गती' या विषयावर परिसंवाद होईल. शिक्षक नेते शिवराम म्हस्के, सुभाष महेर (संभाजीनगर) व प्रा.सुशील शेजुळे (पालघर) या विषयावर बोलतील. सायंकाळी खुले सत्र व डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. 'भाषिक वर्चस्वाचे राजकारण' हे डॉ. मारोती कसाब व डॉ.विलास बुवा संपादित पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT