Abdul Sattar  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar: शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 'मविआ'च्या बनकरांची डोकेदुखी वाढली

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेल्या 'पिपाणी'चा फटका मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात या पक्षाला बसला होता. तसाच फटका शिवसेनेच्या...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : राजकारणात कन्व्हेन्स करता आलं नाही तर कन्फ्युज करायचं असतं,असं नेहमी म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार विधानसभेच्या सिल्लोड -सोयगाव मतदारसंघात होताना दिसतोय.

महायुती सरकार मधील विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात शिवसेना महाविकास आघाडीने भाजपमधून आयात केलेल्या सुरेश पांडुरंग बनकर यांना उमेदवारी दिली आहे. बनकर यांनी याआधी सत्तार यांच्या विरोधात भाजपकडून दोन वेळा निवडणूक लढवली आहे. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वादातून सुरेश बनकर यांची महाविकास आघाडीत पाठवणी करण्यात आली आहे. 2019 मध्ये अब्दुल सत्तार हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले असल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सिल्लोडच्या जागेवर दावा केला. मात्र, या मतदारसंघात या पक्षाचे फारसे संघटन नसल्यामुळे सत्तार यांना रोखायचे असेल तर आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून तगडा उमेदवार देणे गरजेचे होते.

महाविकास आघाडीचा हा शोध पुन्हा सुरेश बनकर यांच्यापर्यंत येऊन थांबला. राज्यात महायुती असल्यामुळे भाजपला या मतदारसंघातून थेट उमेदवार देता येणे शक्य नव्हते. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विरोधातील कामाचा बदला घ्यायचा असल्यामुळे त्यांनी भाजपमधील आपल्या शिलेदाराला थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पाठवले.

सत्तार यांनी केलेल्या गद्दारीचा वाचपा काढण्यासाठी उमेदवाराच्या शोधात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही बनकर यांचा स्वीकार करत आपल्या पक्षाची मशाल त्यांच्या हाती सोपवली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना महाविकास आघाडीचे सुरेश पांडुरंग बनकर याच नावाच्या आणखी एका मुंबईतील व्यक्तीने थेट सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला.

बहुजन समाजवादी पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज या सुरेश पांडुरंग बनकर यांनी दाखल केले होते. बसपाच्या अर्जासोबत एबी फॉर्म नसल्यामुळे तो बाद करण्यात आला. मात्र अपक्ष भरलेला दुसरा अर्ज वैध ठरल्याने आता सिल्लोडच्या निवडणुकीत दोन सुरेश पांडुरंग बनकर लढणार आहेत.

या दुसऱ्या सुरेश पांडुरंग बनकर यांना मुंबईच्या कांदिवलीतील थेट सिल्लोड सोयगाव मध्ये कोणी आणले? याची चर्चा असली तरी त्यामागे कोण आहे? हे वेगळे सांगायला नको. मतदारांना कन्फ्युज करण्याचा हा प्रकार निवडणुकीत किती यशस्वी ठरतो, शिवसेना महाविकास आघाडीच्या बनकर यांना या एकाच नावाच्या उमेदवारीमुळे किती फटका बसतो यावर सिल्लोडचा निकाल अवलंबून असणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी चा फटका मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात या पक्षाला बसला होता. तसाच फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांना अपक्ष सुरेश बनकर यांच्यामुळे बसतो का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत चार नोव्हेंबर आहे. त्या दिवशी हे मुंबईचे सुरेश पांडुरंग बनकर आपला अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT