Maharashtra Vidhan Sabha Election: एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेची ताकद हळुहळु घटवत पक्षाचा वाघ बीडच्या पिंजऱ्यात कैद केला होता. अलिकडच्या राजकारणातील मुत्सद्दी अशी प्रतिमा झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एखाद्या जिल्ह्यात आपला पक्ष शुन्यावर येत असल्याच्या वाटाघाटी नेमक्या कशा केल्या, असा प्रश्न आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील एकमेव जागेवर नव्याने मित्रपक्ष झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ताबा घेतला आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर ताकद क्षीण झालेल्या कॉंग्रेसची परळीतील एकमेव जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कायमची आपल्याकडे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या शिवसेनेचा बाण आणि महाविकास आघाडीतील मोठा पक्ष कॉंग्रेसचा पंजा या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात नसेल.
1995 साली युतीची स्थापना झाली तेव्हा जिल्ह्यात रेणापूर, चौसाळा, केज, माजलगाव, आष्टी, गेवराई व बीड हे सात मतदार संघ असत. भाजपला (BJP) केवळ दोन तर शिवसेनेला सुरुवातीला पाच जागा असत. पुढे भाजपने कोकण किंवा मुंबईची जागा शिवसेनेला द्यायची व शिवसेनेची जिल्ह्यातील एकेक जागा आपल्याकडे घ्यायची असा शिरस्ता सुरु केला.
सरतेशेवटी युतीमध्ये केवळ बीड मतदार संघ शिवसेनेकडे व उर्वरित सर्व विधानसभा मतदार संघ भाजपकडे असे चित्र झाले. दिवंगत मुंडेंच्या काळात बीडच्या शिवसेनेचे कंट्रोलही त्यांच्याकडेच असे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फुट पडली.
तर, वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडून एक पक्ष महायुतीत सहभागी झाला. अगोदर एका मित्राने शिवसेनेच्या वाघाला जेरबंद केले होते. आता दुसऱ्या मित्रानेही या वाघाच्या पिंजऱ्यालाच आपल्या कैदेत घेतले आहे. महायुतीतली बीडची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने पदरात पाडून घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या पक्षातील नेते उमेदवार म्हणून योग्य वाटत नव्हते तर राणे, दानवे प्रमाणे मित्र पक्षाचा नेता आयत्यावेळी आपल्या पक्षात घेऊन त्याला आपल्या पक्षाची उमेदवारी दिली असती तर जिल्ह्यात पक्षाचा धनुष्यबाण तरी निवडणुकीत दिसला असता.
मात्र, ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा उमेदवार असे सुत्र मांडून या जागेवर राष्ट्रवादीने कब्जा केला असला तरी येथील आमदारच मुळात त्यांच्या पक्षात नाही हे विशेष. एखाद्या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे चिन्हच निवडणुकीत राहत नसतानाही त्यांची ही सैल भूमिका शिवसैनिकांचे खच्चीकरण करणारी आहे.
तीच गत कॉंग्रेसचीही झाली आहे. १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापनेनंतर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे तत्कालिन सर्व दिग्गज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. खासदार रजनी पाटील, अशोक पाटील, राजकीशोर मोदी, पंडितराव दौंड अशी मोजकी मंडळी काँग्रेसमध्ये थांबली.
नंतर आघाडी स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील पाच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर परळीची जागा कॉंग्रेसला असे. मागच्या निवडणुकीत तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने ही जागाही आपल्या पदरात पाडून घेतली.
आताही या निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली मात्र ती तुतारी चिन्हाची. त्यामुळे आता विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे चिन्हही नसणार आहे. एकूणच मुख्यमंत्रयांचा शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतला मोठा काँग्रेस पक्षाला भविष्य काय, असा प्रश्न आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.