Palghar News : शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावलून राजेंद्र गावित यांना तिथे उमेदवारी दिल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. महायुतीकडून तिकीट कापण्यात आल्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या वनगा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घात केला असा खळबळजनक आरोप केला होता.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. तसेच ते 36 तासांपेक्षा जास्त काळ बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. एकीकडे पोलिसांकडून कसून तपास सुरू असतानाच वनगा मंगळवारी मध्यरात्री घरी परतले आणि कुटुंबियांची चर्चा करून पुन्हा घराबाहेर पडले. आता त्यांनी चार दिवसांतच यू-टर्न घेतला असल्याचे पाहायला मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानं प्रचंड दुखावले गेलेले श्रीनिवास वनगा यांनी घरी परतल्यानंतर 'साम' वृत्तवाहिनीला संवाद साधला. ते म्हणाले,‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घात केला नाही,तर फक्त साहेबांना मिस गाईड करणाऱ्यांनी घात केला. माझ्याबद्दल साहेबांना मिस गाईड करण्यात आलं. पण आता आपण ठाकरे गटाच्या संपर्कात नसून फक्त एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहोत.
पण आता आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या संपर्कात नसून फक्त एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहोत. मी आश्वासनावर राहणार नाही. मला जे काम दिलं ते करणार आहे.आमचं घराणं महायुतीत आहे.आपण निष्ठावंत असून भाजप आणि शिवसेना व्यतिरिक्त मी कोणत्याही पक्षाचं काम करू शकत नाही, असंही वनगा यांनी स्पष्ट केलं आहे.
वनगा म्हणाले, आता तरी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा नाही. उद्धव ठाकरे व्यक्ती चांगले आहेत. खूप चांगले आहेत. हे मान्य करतो. पण आतातरी उद्धव ठाकरे यांना भेटायला जाण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं.त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत खरंच काही काम होत नव्हतं.
पण शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या मतदारसंघात 1200 कोटींचा निधी आणला. शिंदे यांनी मला भरपूर काही केलं.मी सुरत, गुवाहाटीला गेलो.एकटाच नाही.सर्व होतो. मी डान्स केला नाही. मी माझ्या रुममध्ये होतो, अशी भूमिकाही श्रीनिवास वनगा यांनी मांडली.
शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले, माझी भूमिका काही नाही. फक्त शंभूराज देसाई यांच्याशी बोललो. माझे तिकीट कापण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचलं. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदेसाहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. ते जे सांगतील, ते मी करेल. आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावेही वनगा यांनी सांगितली.
ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल. कालपासून मुलाची तब्येत बरी नाही. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. राजकीय भूमिका काय घेणार? हे पुढे बघेन, असे ते म्हणाले. मला विधान परिषदेची आशा नाही, असे त्यांनी म्हटले.
वनगा काय म्हणाले होते..?
शिवसेनेकडून सोमवारी (ता.28) संध्याकाळी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा पत्ता कट करत त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज श्रीनिवास वनगा यांचा प्रसारमाध्यमांसमोरच अश्रूंचा बांध फुटला. उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असं धक्कादायक विधान श्रीनिवास वनगा यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.