Chhatrapati Smabhajinagar Market Committee News
Chhatrapati Smabhajinagar Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Market Committee : महाविकास आघाडी मजबूत, भाजप-शिंदे गटाचेही जुळले..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत (Market Committee) अखेर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाची युती झाली आहे. पैठणमध्ये भाजपला नाकारणाऱ्या पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिंदे गटाला मोठेपणा दाखवत भाजपने मात्र छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत चार जागा दिल्या आहेत. महाविकास आघाडी भक्कम असली तरी त्यांचा एक उमेदवार भाजपच्या गोटात दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे अभिजीत देशमुख यांनी उमेदवारीसाठी भाजपच्या तंबूत उडी मारली. आता १८ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत.

पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी युतीसाठी पुढाकार घेतला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १३२ जणांनी माघार घेतली. (Mahavikas Aghadi) बाजार समितीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व दिसेल. आमच्यावर सातत्याने तेच ते आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा जनाधार घटल्याचेही सिद्ध होईल, अशी टीका पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Shivsena-Bjp) भाजप-शिवसेना युतीचे पॅनल जाहीर झाले आहे. हरिभाऊ बागडे आणि संदिपान भुमरे यांनी संयुक्तपणे पॅनलची घोषणा केली. भाजप-शिवसेना युतीच्या पॅनलमध्ये १५ उमेदवार आहेत. सर्वसाधारण गटातून राधाकिसन पठाडे, श्रीराम शेळके, गणेश दहीहंडे, आत्माराम पळसकर, भागचंद ठोंबरे, मुरलीधर चौधरी आणि अभिजीत देशमुख उमेदवार आहेत.

महिला गटातून जनाबाई ठोंबरे, सुजाता गायके, इतर मागासवर्गीय गटातून भागीनाथ नवपुते, विमुक्त जाती गटातून पूनमचंद बमणे, ग्रामपंचायत गटातून दत्तात्रय उकीर्डे, सय्यद कलीम, आर्थिक दुर्बल घटक गटातून योगेश ससेमहाल आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून गौतम घोरपडे उमेदवार आहेत. काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांनी बाजार समितीत नियमबाह्य कामे केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता. तीन गाळे रेडीरेकनर दरापेक्षाही कमी दरात त्यांनी पदरात पाडून घेतले होते.

नंतरच्या प्रशासकानेही बाजार समितीचे नुकसान केले, असा आरोप बागडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत देशमुख पॅनलमध्ये असल्याचे बागडे यांनी समर्थन केले. ही निवडणूक पक्षविरहीत असून समविचारी लोक एकत्रित लढवू शकतात, असे बागडे म्हणाले. दरम्यान, एकूण १५ जागांपैकी ११ जागा भाजपला आणि चार जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. याबाबत आमची तक्रार नाही, उलट चार जागा दिल्या हा बागडे यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे समर्थन भुमरे यांनी केले.

भाजप-शिंदे गटाला पराभूत करू..

तर कुणाला किती जागा दिल्या तरी ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असेच आहे, अशी पाठराखण बागडे यांनी केली. बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिवसेना युतीच्या पॅनलला टक्कर देणार आहे. यामध्ये काँग्रेस ९, राष्ट्रवादी ३, ठाकरे गटाला ३ जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीने सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत या मतदारसंघातून जोर लावला आहे.

आता बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या पॅनल मध्ये लढत होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस जगन्नाथ काळे म्हणाले की, आमच्यात कोणतीही बंडखोरी झालेली नाही. आमचे पॅनल तयार झालेले आहे, ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होतो त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला पराभुत करु.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT