Shivsena Local Body Election 2025 News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : मराठवाड्यात महायुतीला तडा; अब्दुल सत्तार, संतोष बांगर यांनी स्वबळासाठी दंड थोपटले!

Local Body Election 2025 : सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महायुती नको, स्वबळावर शिवसेनेचा भगवाच फडकवणार, असे म्हणत दंड थोपटले आहेत.

Jagdish Pansare

  1. मराठवाड्यात महायुतीत फूट पडल्याचे संकेत, सत्तार आणि बांगर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली.

  2. एकनाथ शिंदेंच्या गटातील या दोन आमदारांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  3. येत्या स्थानिक निवडणुका महायुतीसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

Marathwada Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती एकत्र लढणार असं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितलं जातं. मात्र स्थानिक पातळीवर त्या त्या मतदारसंघातील आमदारांची आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची वेगळीच भूमिका असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तीनही नेत्यांनी महायुतीचा राग आळवला असला तरी आमदारांचा मूड मात्र वेगळाच दिसतो.

इकडे मराठवाड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदारांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महायुती नको, स्वबळावर शिवसेनेचा भगवाच फडकवणार, असे म्हणत दंड थोपटले आहेत. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्रितच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका आम्ही युतीत लढणार आहोत असे शिंदे ठामपणे म्हणाले होते. नेत्यांची इच्छा असली तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती आणि राजकीय समीकरणे वेगळी आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेचे (Shivsena) काही आमदार स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत, तशीच भाजपकडूनही केली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मात्र अद्याप ठामपणे पुढे आलेली नाही.

मराठवाड्याचा विचार केला तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. प्रत्येकाचा आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्लॅन ठरला आहे. अब्दुल सत्तार यांनी तर मतदार संघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेत स्वबळाची घोषणाच करून टाकली.

माझ्या मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सगळ्या संस्थांमध्ये केवळ शिवसेना आणि शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सगळे शिवसेनेचे असतील, असा दावा सत्तार यांनी केला आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार अवघ्या 1420 मतांनी विजयी झाले. विधानसभेत काठावर विजय मिळाल्यानंतर सत्तार यांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून मतदार संघ नव्याने पिंजून काढला आहे.

महायुती असली तरी भाजपशी त्यांचे संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद मतदारसंघात नसल्यामुळे सत्तार यांना महायुतीच्या कुबड्या आता नकोशा झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत युती असताना सत्तार यांच्या विरोधात भाजपने काम केल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्र पक्षांना दूर ठेवत एकहाती सत्ता आणण्यासाठी सत्तार यांनी कंबर कसली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांना साथ असल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षभरापासून संघटनात्मक कामात जिल्हा किंवा मराठवाडा स्तरावर सत्तार यांनी क्वचितच सहभाग नोंदवला आहे. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून सत्तार यांनी शहराशी आणि संघटनेशी फारसा संपर्क ठेवलेला नाही. एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर असतील तेव्हाच सत्तार हजेरी लावतात. एरवी पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला ते नसतात.

सत्तारांना भाजपाशीच लढावे लागणार?

पक्षांतर्गत वाद टोकाला गेल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी सध्या संपूर्ण लक्ष आपल्या मतदारसंघावर केंद्रित केले आहे. तिकडे हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून युती आघाडी केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करू आणि त्यांना निवडून आणू, असे स्पष्ट करत बांगर यांनीही स्वबळासाठी दंड थोपटले आहेत.

एकूणच मराठवाड्यात महायुतीला तडा गेल्याचे चित्र यावरून दिसून येते. भाजपचीही शिवसेना, राष्ट्रवादी सोबत युती करण्याची फारशी इच्छा नसल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात मराठवाड्यामध्ये झालेल्या विभागीय आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर महायुतीची भाषा करणाऱ्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची भाषा बदलली आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी दाखवत भाजपनेही महायुतीच्या प्रयत्नांना तिलांजली दिल्याचे दिसून येते.

FAQs

प्र.१: महायुतीत नेमकी फूट कुठे पडली आहे?
उ. मराठवाडा विभागात सत्तार आणि बांगर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने फूट स्पष्ट झाली आहे.

प्र.२: सत्तार आणि बांगर कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
उ. दोघेही एकनाथ शिंदे गटाशी संबंधित आमदार आहेत.

प्र.३: या निर्णयाचा महायुतीवर काय परिणाम होईल?
उ. महायुतीतील मतविभाजन वाढून स्थानिक पातळीवर उमेदवार निवडण्यात अडचणी येऊ शकतात.

प्र.४: शिंदे गटाची अधिकृत प्रतिक्रिया काय आहे?
उ. अद्याप शिंदे गटाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु नाराजी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्र.५: पुढील स्थानिक निवडणुका कधी होणार आहेत?
उ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT