मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या गटप्रमुख मेळाव्यात हजेरी लावली नाही, त्यामुळे वादाचे नवे वारे उठले आहेत.
सत्तार आणि शिंदे यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काही सूत्रांच्या मते, सत्तारांचा “प्रासंगिक करार” संपुष्टात आला असल्याचे संकेत मिळत आहेत.
Shivsena News : काँग्रेसचा हात सोडून 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी वारंवार आपला हा प्रासंगिक करार असल्याचे म्हटले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा करात सत्तार यांनी शिंदे यांच्यासोबत कायम ठेवला. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारमध्ये सत्तारांना मंत्री पद मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत होण्याइतपत विश्वास संपादन केलेले अब्दुल सत्तार आता मात्र शिंदेच्या 'गले की हड्डी' बनले आहेत.
देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना (Abdul Sattar) डावलण्यात आले. अर्थात याला त्यांनी मंत्रीपदाच्या काळात केलेल्या कारनाम्यांची किनार होती. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या सत्तारांवर एकनाथ शिंदेंनी दोन्ही हाताने निधी लुटवला, पण सत्तारांचे एवढ्याने काही समाधान झाले नाही. राज्याच्या सत्तेत बॅकफूटवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांना संघटनात्मक वाढीसाठी गरज असताना अब्दुल सत्तार मात्र गेल्या आठ-दहा महिन्यापासून अलिप्त आहेत.
पालकमंत्री पदावरून संजय शिरसाट यांच्याशी सत्तारांचा झालेला वाद, ऐकमेकांना धडा शिकवण्याची भाषा पाहता अब्दुल सत्तार शिवसेनेशी असलेला आपला प्रासंगिक करार संपवणार? यांचे संकेत मिळत आहेत. गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागीय बैठक आणि त्यानंतर शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी सत्तारांनी शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीला आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. पण मेळाव्याकडे पाठ फिरवत मतदारसंघात निघून गेले.
त्यानंतर काल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे अब्दुल सत्तार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. एकनाथ शिंदे यांना भेटायलाही सत्तार आले नाही. ते मुंबईला गेले असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले असले तरी ते छत्रपती संभाजीनगरमध्येच होते असा दावा विरोधकांनी केला आहे. एकूण काय? तर अब्दुल सत्तार पुन्हा नव्या राजकीय समीकरणाच्या वाटेवर निघाले याचीच ही चिन्ह म्हणावी लागतील.
सिल्लोड नगरपरिषदेतील सत्ता अब्दुल सत्तार यांच्यासाठी जीव की प्राण आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघात सत्तार यांना असा काही झटका बसला की ते अद्याप त्यातून सावरू शकलेले नाहीत. सर सलामत, तो पगडी हजार, या प्रमाणे नगर परिषदेतील सत्ता, पंचायत समिती आणि मतदारसंघातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था व सोसायट्यांवर आपली पकड कायम ठेवण्यावर सत्तारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी झालेल्या वादानंतर अब्दुल सत्तार यांनी आपला सवता सुभा भक्कम करण्यावर जोर दिला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करण्याची जोखीमही सत्तार यांना चुकीची वाटत नाही. मतदारसंघातील बांधणी, नगरपरिषदेतील सत्तेच्या जोरावर अब्दुल सत्तार हे राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना झुकवत आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरूवातीला यशस्वी झालेला हा प्रयोग कालांतराने मात्र फसला, असेच म्हणावे लागेल.
जिल्ह्यातील नेत्यांनाही सत्तार नकोसे..
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून सर्वाधिक निधी, योजना आणि प्रकल्प मतदारसंघासाठी खेचून आणणारा आमदार म्हणून अब्दुल सत्तार यांचे नाव घेतले जायचे. पण आता या सगळ्या निधी, प्रकल्प, योजनांना ब्रेक लावण्यात आला आहे. यातून सत्तार यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्हास्तरावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सत्तार यांचे विमान विधानसभा निवडणुकीत झालेल्या निसटत्या विजयानंतर जमीनीवर आले आहे.
आधी मतदारसंघ मग, संघटना आणि नेते अशी भूमिका त्यांनी स्वीकारल्याचे दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारसंघात एकहाती विजय मिळवून पुन्हा नव्या वाटेवर सत्तार निघाले तर नवल वाटायला नको. महत्वाकांक्षी, धुर्त राजकारणी म्हणून परिचित असलेल्या सत्तार भाईंची नवी चाल काय असले? शिंदेंसोबतचा प्रासंगिक करार ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी आधीच मोडीत काढतात? की मग 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहतात? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही अब्दुल सत्तार यांना दूरच ठेवण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते.
1. अब्दुल सत्तार कोणत्या मेळाव्यात गैरहजर राहिले?
ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना गटप्रमुख मेळाव्यात गैरहजर राहिले.
2. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण काय सांगितले जात आहे?
अधिकृत कारण स्पष्ट नाही, पण अंतर्गत नाराजी आणि मतभेदामुळे त्यांनी उपस्थित राहणं टाळल्याची चर्चा आहे.
3. यामुळे शिंदे-सत्तार युतीवर काय परिणाम होऊ शकतो?
या घटनेमुळे शिंदे-सत्तार यांच्यातील संबंध ताणले जाण्याची आणि महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
4. शिंदे गटाची प्रतिक्रिया काय आहे?
शिंदे गटाने सत्तारांच्या अनुपस्थितीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र अंतर्गत असंतोषाची चर्चा सुरू आहे.
5. सत्तार आता कोणत्या भूमिकेत आहेत?
ते शिंदे गटाचे आमदार असून, मराठवाडा विभागातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.