Pradeep Naik, Bhimrao Keram Sarkarnama
मराठवाडा

Mahur Market Committee Elections Result : माहूर बाजार समितीवर प्रदीप नाईकांचे वर्चस्व; भाजप, काँग्रेसचा धुव्वा

Mangesh Mahale

साजीद खान

Mahur : माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात आज (रविवार) भाजपचे आमदार भीमराव केराम काँग्रेसचे पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे व तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्योतिबा खराटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकर सिडाम यांनी आपला गड राखला आहे. माहूर बाजार समितीत भाजप-काँग्रेस गटाला केवळ ४ जागा, तर उर्वरित १४ जागांवर राष्ट्रवादी आघाडीला एक हाती सत्ता मिळाली आहे.

ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या अत्यंत चुरशीच्या माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. यात माजी आमदार प्रदीप नाईक, ज्योतिबा खराटे आणि समाधान जाधव यांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीला जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते.

माजी मंत्री अशोक चव्हाणांच्या काँग्रेसला सोबत घेऊन युतीचा नवीन पायंडा महाराष्ट्रात बहुदा माहूर बाजार समिती निवडणुकीत पाडला गेला. राज्यात आणि केंद्रात काय चाललंय यापासून कोसो दूर असलेल्या तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव केशवे यांनी भाजपशी सरसंधान साधून जनतेच्या मनाविरुद्ध युती केली होती. या निवडणुकीत जात फॅक्टरचाही उपयोग करण्यात आला, तर ग्रामपंचायतला शासकीय निधी देण्याचे गाजर दाखवून प्रलोभन देण्याचेही प्रयत्न झाले.

बाजार समिती निवडणूक निकालात विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्या भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना गटाला केवळ ४ जागेवर समाधान मानावे लागले. त्यातही काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक, माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवे यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई राजेंद्र केशवे यांचा केवळ एका मताने निसटता विजय झाला. एकंदरीत बळीराजा शेतकरी विकास पॅनेल महाविकास आघाडीला १४ तर भाजप -काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. १४ जागा मिळवून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या आघाडीने आजी आमदार आघाडीवर वर्चस्व सिद्ध केले.

“प्रदीप नाईक तेरा जादू चल गया”

केंद्रात व राज्यात सत्ता स्थानी असलेले विद्यमान आमदार भीमराव केराम राज्याचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे सचिन नाईक व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाला खिंडार देत मतदारांनी माजी आमदार प्रदीप नाईक व शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते ज्योतिबा खराटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव भावी राजकारणाच्या गाडीला डबल बेल मारल्याने आता ही गाडी सुसाट वेगाने धावणार, तर बाजार समितीच्या निवडणुकीत नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे प्रचंड धनशक्तीचा काही एक उपयोग झाला नाही, हे मात्र अधोरेखित झाले आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ढोल, ताशे, डफडे व पारंपरिक वाद्याने साजरा करताना गुलाल उधळत हात उंचावून कार्यकर्ते म्हणाले “प्रदीप नाईक तेरा जादू चल गया”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT