Beed boat accident involving 60 devotees Sarkarnama
मराठवाडा

Beed Boat Accident: बीडमध्ये दर्शनासाठी गेलेल्या 60 भाविकांची बोट उलटली : दोघींना जलसमाधी तर पाच गंभीर जखमी

Purushottampuri Boat Accident: पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेली बोट गोदावरीत बुडाली. दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Jagdish Pansare

Boat carrying devotees overturns in Beed: 'अधिक मास' निमित्ताने बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. तीन वर्षांनंतर हा योग आल्यामुळे आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट गोदावरी पात्रात बुडाली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीच्या चालकाने बसवल्याने गोदावरी पात्रात काही अंतरावर जाताच बोट बुडाली.

महिला, पुरुष यांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. अनेक महिला भाविकांनी देवाचा धावा केला. बोट बुडाल्याची दिसताच उपस्थित लोक, नागरीक आणि बचाव पथकाने तात्काळ गोदावरीत उड्या घेत लोकांना वाचवले. मात्र या दुर्दैवी घटनेत दोन भाविक महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरीक घटनास्थळी दाखल झाले.

परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य राबवत लोकांना गोदावरी नदीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आधीच नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आज बोल उलटण्याची घटना घडली. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे प्रशासनाने मोठा खर्च करून येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. मात्र या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाचा हा दावा खोडून काढत भाविकांना कुठल्याच सुविधा नसल्याचा आरोप केला.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पुरुषोत्तमपुरीमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. जास्त धंदा व्हावा, या लालसेपोटी बोट चालवणाऱ्यांकडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. दहा लोकांची क्षमता असताना पन्नास लोक बोटीत बसवून ती गोदावरी पात्रातून नेली जात होती, असा आरोप या दुर्घटनेतून बचावलेल्या काही महिला भाविकांनी केला आहे.

बोट चालवणाऱ्याने 50 पेक्षा अधिक लोकांना बसवल्यानंतर अनेक महिला बोटीतून उतरत होत्या. परंतु बोट चालकाने उतरू दिले नाही. धमकी देऊन बळजबरीने प्रवाशांना बोटीत बसायला भाग पाडले. परिणामी बोट उलटली आणि सगळे प्रवासी पाण्याच्या तळाला गेले. बोट उलटल्यानंतर अनेकांनी 'श्रीस्वामी समर्थ, श्रीस्वामी समर्थ' म्हणत देवाचा धावा केला. एका महिलेच्या साडीचा पदर बोटीत अडकल्यामुळे ती बाहेर आल्याचे सांगीतले जाते.

मात्र या दुर्दैवी अपघातात दोन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर पाच-ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा.लोणार) यांचा तर अजुन एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तिसरी महिला सिंधूबाई अर्जुन मावळे (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, 19 मे रोजी एका जणाचा या गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाने याबाबत कसलीही दखल घेतली नसल्याने दोन महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बोटीतून प्रवास करणार्‍या भाविकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसुल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT