Manoj jarange news : मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड जिल्ह्याच्या राजकारणात हा सर्वात धक्कादायक निकाल ठरला. सरपंच झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी आज आंतरवाली सराटीत येऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे गावाच्या विकासाचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे स्वरूपानंद यांनी या भेटीत सांगितले. दरम्यान या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. दीड वर्षांपूर्वी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणात अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी राज्यभरात न्याय मोर्चे काढले होते.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या प्रवासात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये ही अनेकदा भेट देऊन या प्रकरणात सरकारला जाब विचारला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी उडी घेतली आणि अश्विनी देशमुख यांचा आश्चर्यकारकरीत्या पराभवही केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबीयाबद्दल सहानुभूती असताना अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले.
नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, त्यांच्या न्यायालयीन लढ्यात आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. परंतु राजकारण आणि न्यायालयीन लढा या स्वतंत्र बाबी असल्याचे स्पष्ट करत निवडणूक प्रचार केला होता. गावकऱ्यांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवत त्यांना 92 मताच्या फरकांनी निवडून दिले.
निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आज स्वरूपानंद देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. जरांगे पाटील यांनी स्वरूपानंद देशमुख यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी काम करा, अशा सूचना दिल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.