Manoj Jarange  Sarkarnama
मराठवाडा

Manoj jarange News : आमची मतं गोड वाटतात; आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या 'मविआ'ला जरांगेंनी झापलं

Sachin Waghmare

Beed News : राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस विरोधी पक्षाचे नेते गैरहजर राहिले. त्यामुळे या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे बुधवारी विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. त्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या महाविकास आघाडीला आमची मतं गोड वाटतात का, असे म्हणत शेलक्या शब्दांत सुनावले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठ्यांनी मतदान केले आहे, हे विसरू नका. त्यावेळी मतदान घेताना तुम्हाला बरे वाटले, आता आरक्षणाच्या प्रश्नांवर बोलायला मात्र तयार नाहीत. तर सत्ताधारी आश्वासन देऊनही या मुद्द्यावर तोंड उघडण्यास तयार नाहीत. मात्र,आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न दिल्यास या सर्वांना परत जागेवर आणा, असे आवाहन यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी केले. (Manoj jarange News)

बीड येथे पार पडलेल्या मराठा बांधवाच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्य सरकरने आमच्या हक्काचं आरक्षण द्यावे. महाविकास आणि महायुतीवाले एकच आहेत, असे दिसत आहे. महाविकासवाले बैठकीला गेले नाहीत म्हणून महायुतीवाल्यांनी आरक्षणावर निर्णय घेतला नाही. त्यांना कोण अडवलं होतं? त्यांनी लवकर आरक्षणावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने यापुढील काळात जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी नाव घेऊन सांगणार, यांना पाडा. आपण कुणीही उमेदवार देऊ, त्याला साथ द्यायची. मतदान 100 टक्के करायचे असे आवाहन त्यांनी केले. सरकारच्या बाजूने जाऊन वाटोळे करू नका. निवडणुकीत हार जीत होत असते. एकदा पराभव झाल्यावर माझ्या समाजाला तुम्ही जातीयवादी ठरवत आहात. मराठा कधीही जातीयवादी नव्हता, हे ओबीसी नेते सगळे एकत्र झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) आहे. कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. बाकी कुणालाही विरोध नाही. मराठ्यांच्या नोंदीसुद्धा रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना साथ द्यायची नाही, त्यांना पाडायचंच. धनगर समाजाला मराठा आरक्षणामुळे कोणताही धोका नाही. फक्त छगन भुजबळ सांगतात म्हणून यांचे नेते आपल्याला विरोध करतात, असेही जरांगे म्हणाले.

कुणाला काय डाव टाकायचे ते टाकू द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही काय नवीन मागत नाही, जे वाशीमध्ये ठरलं होतं तेच द्या. सगेसोयऱ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करा.आम्ही गेल्या काही दिवसापासून करीत असलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीची तातडीने अंमलबजावणी करा. सुरूवातीला ओबीसींच्या यादीत फक्त 180 जाती होत्या, नंतर त्यामध्ये पोटजाती म्हणून 450 च्या वर जाती वाढल्या. मग कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून त्यामध्ये का समावेश करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT