Mumbai News : विधान परिषदेच्या आमदारांतून निवडुन द्यायच्या 11 जागेसाठी 12 जुलै रोजी मतदान होत आहे. या 11 जागेसाठी 12 जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असल्याने मोठी चुरस पहावयास मिळत आहे. जून 2022 मध्ये झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीतच सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला होता.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना धक्कादायकरित्या पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचदिवशी रात्री शिवसेनेच्या आमदारांनी बंड करीत गुवाहाटी गाठली तर त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा कस लागणार आहे. या विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाने त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. एक उमेदवार नक्की हरणार आहे. मात्र, तो कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महायुती बरीच बॅकफूटवर आली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने दोन जागा जिंकत महायुतीसोबत बरोबरी केली आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांवर या विधान परिषद निवडणुकीतील जय-पराजयाचा परिणाम होणार असल्याने सर्वच पक्ष काळजी घेत आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी 6 जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक दोन दिवसांवर आलेली असताना भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्याकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतांची आकडेमोड केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने अचानक ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत बाजी मारली. ठाकरे गटाकडे 16 मते असून निवडून येण्यासाठी त्यांना सात मतांची जुळणी त्यांना करावी लागणार आहे. नार्वेकर यांचे सर्व पक्षातील आमदारासोबत चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा ठाकरे गटाला होणार आहे. त्यामुळेच ठाकरे गटाने त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत दोन जागी विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढला आहे. नार्वेकर यांचे सर्वपक्षांतील संबंध पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक जड नसणार आहे. मात्र, त्यांनी निवडणूक रिंगणात अचानक घेतलेल्या एन्ट्रीने 12 पैकी एक उमेदवाराचा नक्की पराभव होणार आहे. हा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधान सभेतील 14 आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ आता 274 इतके झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची 23 मते मिळवणं आवश्यक आहे. या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा ठरवला आहे. त्यामुळे विजयासाठी 23 मते उमेदवाराला मिळवावी लागणार आहेत.
सहा पक्षापैकी केवळ काँग्रेसला (Congress) इतर पक्षांची मते घ्यावी लागणार नाहीत. त्यांच्याकडे 37 आमदार असून एकच उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने त्यांच्याकडे 14 मते अतिरिक्त आहेत. ते आपली मते मित्रपक्ष असलेल्या जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची उर्वरित 14 सर्व मते ट्रान्स्फर झाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका नाही. नार्वेकरांना सात मते गरजेचे आहेत तर जयंत पाटलांकडे शरद पवार गटाची 12 तर शेकाप व माकपची तीन अशी 15 मते आहेत त्यांना आठ मतांची आवशकता आहे.
दुसरीकडं विधानसभेत भाजपकडे 103 आमदारांचं संख्याबळ आहे. पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी 115 मतांची आवश्यकता आहे. 7 अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ 110 पर्यंत आहे. त्यामुळे वरच्या 5 मतांसाठी भाजपला मित्रपक्ष व अपक्षांवर अवलंबून राहावं लागेल.
शिंदे गटानं या निवडणुकीत दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतांची आवश्यकता असेल. विधानसभेत शिंदे गटाकडे 37 आमदार आहेत. त्यामुळे वरच्या 9 आमदारांसाठी शिंदे गटाला तजवीज करावी लागेल. 6 अपक्ष आणि बच्चू कडूंच्या दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतं दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाने दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यांनाही विजयासाठी 46 मतांची गरज आहे. विधानसभेत अजित पवार गटाकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे. त्याशिवाय इतर 3 आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 3 मतांची कमतरता आहे. त्यामुळे नक्की या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा फटका कोणाला बसणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.