Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Maharashtra Tour : मनोज जरांगेंचे दौरे वाढले; राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?

Maharashtra Politics महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांच्या दौऱ्याला ३० सप्टेंबरपासून सुरुवात

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Jalna Political News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे राज्यभर दौरे करणार आहेत. आरक्षणाची मागणी तीव्र करण्यासाठी जरांगे मराठा समाजातील लोकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांचा हा दौरा ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ते मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह बुलढाणा, यवतमाळ,सोलापूर, अहमदनगर, नाशिक येथील समाजाशी चर्चा करणार आहेत. यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही धाबे दणाणले आहेत. (Latest Political News)

राज्यात मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. मराठा समाजाला OBC प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी पुढे आली. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात जरांगेंनी उपोषण केले. आंदोलनकर्त्यांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. परिणामी आंदोलन चिघळले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ४० दिवसांची मुदत देत उपोषण सोडले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा मराठा समाज गाठी-भेटी दौरा ३० सप्टेंबारपासून सुरु होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे व बुलढाणा, यवतमाळ,सोलापूर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांचा प्रवास दौरा ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

समाजाच्या समस्या काय?

मराठा समाज अनेक समस्यांशी सामना करत आहे. शेती व्यवसाय अडचणीत आल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही प्रमुख समस्या आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला भाव मिळत नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण, हुंडा, विवाहाचा वाढत जाणारा खर्च अशा दुहेरी कात्रीत बहुतांश शेतकरी अडकले आहेत. शिक्षण घेऊनही रोजगार नाही. या सर्व समस्या सुटण्यासाठी मराठा समाज आरक्षणाकडे एकमेव उपाय म्हणून बघत आहे. मराठा समाजातील ही अस्वस्थता यामुळे मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्यामुळे व्यक्त होणार आहे. यामुळेच त्यांच्या दौऱ्याला प्रतिसादही मिळेल, अशी चर्चा आहे.

ओबीसींच्या विरोधामुळे सरकारची पंचाईत

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे. यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देताना ओबीसी मते दुरावणार नाहीत, याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष असणार आहे. बहुतांश मतदारसंघात दोन्हीही मते महत्वाची आहेत. विशेषतः शहरी भागात ओबीसी मते निर्णायक आहेत. त्यामुळे मराठा व ओबीसी मते सांभाळताना राजकीय नेत्यांची कसरत होणार आहे.

विरोधक सक्रिय

मनोज जरांगे यांचा संवाद दौरा मराठा आरक्षणासंदर्भात असला तरी सरकारविरोधी गट सक्रीय झाला आहे. जरांगे यांच्या दौऱ्यामुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पडद्यामागून हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात झालेल्या घडामोडींमुळे लोकप्रतिनिधींविषयी असलेली नाराजी यानिमित्ताने व्यक्त होऊ शकते. एकूणच मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्याकडे सर्वच राजकिय नेत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय दिशा निश्चित करणारा हा दौरा ठरू शकतो.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT