दिलीप दखणे
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. तीन दिवसापूर्वी सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, प्रसाद लाड हे अंतरवालीत येऊन गेले. परंतु या भेटीत काहीच तोडगा निघाला नाही. 28 ऑगस्ट पर्यंत त्रुटी दूर करा, प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा अन्यथा निर्णायक आंदोलन होणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.
अंतरवाली सराटीत उपोषणाची तयारी सुरू झाली आहे. मंडप तयार असून जरांगे पाटील पुन्हा सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अवघ्या 36 तासानंतर जरांगे पाटील यांचे अंतरवालीत उपोषण सुरू होणार आहे, सरकारकडून मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा निरोप जरांगे पाटील यांना आलेला नाही. उद्या, 28 रोजी सरकारकडून काही पावले उचलली जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर सायंकाळी सहानंतर आंदोलन करता येणार नाही, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. सरकारकडून कोंडी केली जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी थेट मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. विमान, रेल्वेसेवा बंद पाडू, अशी निर्वाणीची भाषा त्यांनी सुरू केल्याने २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली आणि मुंबईत काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दादागिरी करू नका..
सरकारने दादागिरी करू नये आमचं जर मुंबईला जायचं ठरलं तर आम्ही जाणारच, ज्यांना आम्ही सत्ता दिला तेच आम्हाला मुंबईला येण्यापासून रोखत आहेत. पण आम्ही मुंबईला येणार ते ही वर्षा बंगल्यावर येणार, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. जर मुंबईला निघालो तर वापस येत नसतो. आम्ही कोणत्याही मैदानात उपोषण करू, लोकांना वेठिस धरू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारने त्रास देऊ नये. सहा करोड मराठा मुंबईत आलेला दिसेल. सरकारने आमच्या मागणीबाबत निर्णय घ्यावा, मुंबईत येण्याची आम्हाला हौस नाही, हे आंदोलन सरकारला जड जाईल. अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टला बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. या उपोषण दरम्यान मुंबईत जाण्याची तारीख ठरली, तर आहे त्या वाहनाने मुंबईकडे जायचं आहे.
उपोषण दरम्यान मुंबईला जाण्याचा निर्णय होऊ शकतो, सत्तेत बसवले तेच आम्हाला मुंबईला येऊ देत नाहीत. यामुळे समाजाचा सरकारवर रोष वाढत आहे, सत्तेचा गैरवापर करू नका? आम्ही नियमाप्रमाणे मुंबईत उपोषण करण्यासाठी अर्ज दिला आहे. परवानगी मिळाली नाही तरी आमचं ठरल की आम्ही मुंबईला जाणार आहेत. नोटिसा देऊन दबाव टाकला जात आहे, आमच ठरलं तर आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणारच, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
गोदाकाठच्या गावातून येणार भाजी-भाकरी..
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत 29 ऑगस्ट रोजी दहावे बेमुदत उपोषण सुरू करत आहेत. त्यांनी समाज बांधवाची बैठक घेऊन तयारी केली आहे. वाहनाची पार्किंग कृषी उत्पन्न बाजार समिती वडिगोद्री येथे करण्यात आली आहे. पाणी, जेवण, मंडप, आदी बाबत व्यवस्था करण्यात आली आहे.
रस्ते, वाहतूकीला अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस, पोलीस यांना स्वयंसेवक यांनी कळवले आहे. उपोषणस्थळी जेवण देण्यासाठी गोदाकाठावरील 123 गावातील नागरिक त्यांच्या गावातून भाजी, पोळी-भाकर घेऊन येणार आहेत, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.